पूरक्षेत्रातील बांधकामेच महापुरास कारणीभूत- अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:24 AM2021-07-28T04:24:53+5:302021-07-28T04:24:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : नदीपात्रात झालेली बांधकामे हे एक महापुराचे महत्त्वाचे कारण असल्याचा निष्कर्ष राज्य शासनाने नेमलेल्या वडनेरे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : नदीपात्रात झालेली बांधकामे हे एक महापुराचे महत्त्वाचे कारण असल्याचा निष्कर्ष राज्य शासनाने नेमलेल्या वडनेरे समितीने काढला आहे. त्यामुळे अशा बांधकामांवर आता कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
कोल्हापुरातील पंचगंगा नदीला आलेल्या महापुराशी अलमट्टीच्या धरणाचा कांही संबंध नसल्याचा अहवाल तज्ज्ञ समितीने यापूर्वीच दिला असल्याचा निर्वाळाही त्यांनी यावेळी दिला. नदी-नाल्यांचे मूळ प्रवाह खंडित करणारी अतिक्रमणे काढून टाकण्याबाबत कठोर निर्णय घेतले जातील. अशी अतिक्रमणे काढून टाकण्यात जे अधिकारी हयगय करतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिले.
महापुरास ग्लोबल वॉर्मिंग कारणीभूत आहे. त्यामुळेच चीन-जर्मनीतही हजार वर्षात झाला नाही इतका पाऊस झाला, हे खरे असले तरी पूरक्षेत्रातील बांधकामेही तितकीच जबाबदार असल्याचे मत त्यांनी नोंदवले.
-------------------------
मदतीच्या पॅकेजबाबतही आज मंत्रिमंडळाच्या बैठकीतच निर्णय
पूर रोखण्यासाठी भिंत बांधण्याबाबतचा निर्णय झाला नसून, तो एक पर्याय आहे. मदतीच्या पॅकेजबाबतही कुणी काही घोषणा केल्यातरी आज बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीतच त्याबाबत निर्णय होईल. मागील तीन महापुरांचा अभ्यास करून किती पातळीपर्यंत पाणी आले होते व तेवढे पाणी आल्यास काय उपाययोजना कराव्या लागतील, असा पूरग्रस्त प्रत्येक तालुक्याचा आराखडा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे स्थलांतरापासून जीवितहानी टाळता येणे शक्य होईल.
------------------------------------------
पंचगंगा नदीतील गाळ-वाळू काढण्यासाठी समिती; वाळू काढण्यावरून राजकारण नको
कोल्हापूर : दरवर्षी पुराच्या पाण्यामुळे वाहत येणारी माती साचून पंचगंगा नदीपात्रात गाळ साचला असल्यास गाळ व वाळू काढून नदीचा प्रवाह सुरळीत ठेवता येईल का, याचा अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव एकनाथ पाटील यांची समिती स्थापन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी येथे दिल्या. मी वाळू काढायचे म्हटल्यावर त्यातून कोणतेही राजकारण होऊ नये, त्यातील नियम पाहून आणि लोकांची सुरक्षितता विचारात घेऊनच हा उपाय सुचविला असल्याचेही पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
---------------------------------
पुणे-बंगलोर महामार्गाची उंची वाढवण्याबाबत गडकरी यांच्याशी चर्चा करणार
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, शिरोली व किणीजवळ पुराचे पाणी आल्यामुळे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग बंद झाला. महामार्ग पाण्याखाली गेल्यामुळे दूध, इंधन, अन्नधान्याची वाहतूकही ठप्प झाली. भविष्यात अशी परिस्थिती ओढवू नये, यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. सन २००५,२०१९ व २०२१ मधील पुराच्या पाण्याच्या पातळीचा विचार करून महामार्गाची उंची वाढवण्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली जाईल. राज्य मार्ग व अंतर्गत मार्गांची कामे राज्य शासनासह वर्ल्ड बँक व अन्य बँकांच्या सहकार्यातून केली जातील, असे त्यांनी सांगितले.