कोल्हापुरात ‘कृषी भवन’ उभारू

By admin | Published: May 8, 2016 12:44 AM2016-05-08T00:44:31+5:302016-05-08T00:44:31+5:30

तांदूळ महोत्सव सुरू : चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा; सोमवारपर्यंत चालणार

Construction of 'Krishi Bhawan' in Kolhapur | कोल्हापुरात ‘कृषी भवन’ उभारू

कोल्हापुरात ‘कृषी भवन’ उभारू

Next

कोल्हापूर : कृषी विभागाची सर्व कार्यालये एकाच छताखाली आणून तिथे शेतकऱ्यांसाठी विविध विषयांवर मार्गदर्शन व्हावे, यासाठी कोल्हापुरात ‘कृषी भवन’ उभे करणार असून त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. महाराष्ट्राला दिशादर्शक असे कृषी भवन उभारण्यासाठी अधिकाऱ्यांनी कामाला लागावे, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ‘आत्मा’च्या वतीने शनिवारपासून सोमवार (दि. ९) पर्यंत भगवा चौक, कसबा बावडा येथे सकाळी नऊ ते रात्री १० पर्यंत तांदूळ महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार धनंजय महाडिक होते.
मंत्री पाटील म्हणाले, ‘कोल्हापुरात ‘कृषी’ची सर्व कार्यालये एकाच छताखाली येऊन तिथे शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र उभे करण्याचा मानस असून महाराष्ट्राला दिशा देईल असे कृषी भवन उभे करण्यासाठी अधिकाऱ्यांनी कामाला लागावे, तांदूळ महोत्सवात खात्रीशीर वाण मिळत असल्याने ग्राहकांनी जास्तीत जास्त तांदूळ खरेदी करून शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. यंदा ‘जलयुक्त शिवार’च्या माध्यमातून चांगली कामे झाल्याने आगामी काळात पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही. आठवडी बाजाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ निर्माण करून देण्याचा प्रयत्न असून आतापर्यंत मुंबई, नागपूर व पुणे येथे २६ आठवडे बाजार केले आहेत. कोल्हापुरात पणन विभागाचे अधिकारी जागा शोधत आहेत.’
खासदार महाडिक म्हणाले, तांदूळ महोत्सव सुरुवातीला पथदर्शी प्रकल्प होता, तो संपूर्ण राज्याने स्वीकारला. शेतीमालाला ‘एमआरपी’ नाही; पण येथे शेतकऱ्यांना स्वत:च दर ठरविण्याची मुभा आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा परिषद अध्यक्ष विमल पाटील, विभागीय कृषी सहसंचालक डॉ. एन. टी. शिसोदे, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, नगरसेवक अशोक जाधव, किरण घाटगे, आदी उपस्थित होते. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी गर्दी केली होती.

Web Title: Construction of 'Krishi Bhawan' in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.