रेड झोनमधील बांधकामे बनली कळीचा मुद्दा, नियमांतील पळवाट शोधून परिसरात शेकडो बांधकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 05:46 PM2020-05-29T17:46:44+5:302020-05-29T17:51:59+5:30

वडनेरे समितीने कोल्हापुरातील महापुराला रेड झोनमधील बेकायदेशीर बांधकामे आणि अतिक्रमण कारणीभूत असल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा येथील बांधकामे कळीचा मुद्दा बनली आहेत

Construction in the red zone became a key issue | रेड झोनमधील बांधकामे बनली कळीचा मुद्दा, नियमांतील पळवाट शोधून परिसरात शेकडो बांधकामे

वडनेरे समितीने कोल्हापुरातील महापुराला रेड झोनमधील बेकायदेशीर बांधकामे आणि अतिक्रमण कारणीभूत असल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा येथील बांधकामे कळीचा मुद्दा बनली आहेत

Next
ठळक मुद्देनियमांतील पळवाट शोधून परिसरात शेकडो बांधकामेबेकायदेशीर बांधकामांवर कारवाई टाकण्याचे धाडस महापालिका करणार काय?

कोल्हापूर : वडनेरे समितीने कोल्हापुरातील महापुराला रेड झोनमधील बेकायदेशीर बांधकामे आणि अतिक्रमण कारणीभूत असल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा येथील बांधकामे कळीचा मुद्दा बनली आहेत.

वास्तविक पूरबाधित परिसर रिकामा न ठेवता नियमांतील पळवाट शोधून या परिसरात शेकडो बांधकामे करण्यात आली आहेत. अतिक्रमण, भराव टाकून केलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर महापालिका आता तरी करवाई करण्याचे धाडस करणार काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

कोल्हापूर आणि सांगली येथे मागील वर्षी ऑगस्टमध्ये आलेला महापूर हा सातत्यपूर्ण पडलेल्या पावसाबरोबरच रेड झोनमधील अतिक्रमणे आणि बेकायदेशीर बांधकामामुळेच झाल्याचा अहवाल नंदकुमार वडनेरे समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. या अहवालानंतर रेड झोनमधील बांधकामांचा विषय पुन्हा चर्चेला आला आहे.

रेड झोनमधील नियमांच्या अधीन राहून येथे बांधकामाला परवानगी दिली आहे. मात्र, या नियमांतील पळवाटा शोधून रेड झोनमध्ये शेकडो बांधकामे बेकायदेशीर करण्यात आली असल्याचा आरोप होत आहे. अशा बेकायदेशीर बांधकामांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

बेकायदेशीर बांधकामांवर वरदहस्त कोणाचा?

महापुरानंतरही रेड झोनमधील बेकायदेशीर बांधकामे, अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली नाही, हे वास्तव आहे. वडनेरे समितीनेही आता अहवाल दिल्यानंतरही कारवाईबाबत कोणतीच हालचाल होताना दिसून येत नाही. त्यामुळे अशा बांधकामांवर नेमका कोणाचा वरदहस्त आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.


महापुरानंतर नव्याने पूररेषा निश्चित होत नाही तोपर्यंत पूरक्षेत्रातील बांधकामांना स्थगिती दिली होती. पाटबंधारे विभागाने पूररेषा निश्चित केली असून नियमांच्या अधीन राहून या परिसरात बांधकामांना परवानगी दिली आहे. या परिसरात नियमबाह्य बांधकामे केली असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
- आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी


ड वर्ग महापालिकेच्या लागू असणाऱ्या नियमांनुसारच क्रिडाईच्या सदस्यांनी पूरबाधित परिसरात बांधकामे केली आहे. तसेच महापालिकेची परवानगी घेऊनच बांधकामे केली असून बेकायदेशीर बांधकामे करण्यात आलेली नाहीत.
- विद्यानंद बेडेकर, अध्यक्ष, क्रीडाई

नदीपात्रापासून ५०० मीटर नो डेव्हलपमेंट झोन

मंजूर विकास योजनेमध्ये नदीपात्रापासून पुढे ५०० मीटर नो डेव्हलपमेंट झोन असून येथे कोणतेही बांधकाम करता येत नाही. नदीपात्र ते ब्लू लाईन या परिसराचा यामध्ये समावेश असून येथे केवळ पार्किंग आणि भाजी कट्टे करण्यास परवानगी आहे.


ब्लू लाईन ते रेड लाईनमध्ये नियमाच्या अधीन राहून बांधकाम

ब्लू लाईन ते रेड झोन परिसरात बांधकामांना अटी घालून परवानगी दिली आहे. पूरपातळीच्या वर ०.४५ सेंटीमीटर जोता पातळीपासून दीड फुटावर बांधकाम करता येते.
महत्त्वाची चौकट

ग्रीन लाईनमध्येही बांधकामांना आता अटी, नियम

गतवर्षी ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरामुळे निम्म्या शहरावर परिणाम झाला. नवीन पूररेषा निश्चित करताना ज्या परिरसात पुराचे पाणी आले होते, तो परिसर ग्रीन लाईनने दर्शविला आहे. आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून दक्षता म्हणून महापालिका प्रशासनाने रेड लाईन ते ग्रीन लाईनमध्ये येणाऱ्या परिसरातील बांधकामांना रेड लाईनमधील बांधकामाप्रमाणेच नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या परिसरात आता जमिनीपासून उंचावर तसेच लाईफ जॅकेट आणि बोट उपलब्ध ठेवणे बंधनकारक असणार आहे. प्रशासनाने असा प्रस्ताव महासभेसमोर ठेवल्याची माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली आहे.

भरावच महापुराला कारणीभूत

ड वर्ग महापालिकेमध्ये रेड झोनमधील बांधकामासंदर्भातील नियमावली केवळ १५ ओळींत दिली आहे. याचे स्पष्टीकरण सविस्तर करण्यात आलेले नाही. याचाच फायदा काही बांधकाम व्यावसायिक घेत असून उंचावर इमारत बांधण्यासाठी भराव टाकून बांधकाम करतात. रेड झोनमध्ये बांधकामाचे भरावच महापुराला कारणीभूत ठरत आहेत. भरावामुळे नदीपात्र फुगून शहरी भागात पाणी शिरत आहे. यामुळेच प्रथमच दसरा चौक, फोर्ड कॉर्नर येथपर्यंत पुराचे पाणी आले होते.


...तर महापुरात धोका कमी झाला असता

सन १९८९, २००५ आणि २०१९ मध्ये कोल्हापुरात महापूर आला. २००५ मध्येच पाटबंधारे विभागाने सुधारित पूररेषा निश्चित केली असती तर १४ वर्षांत त्याप्रमाणे बांधकामे झाली असती. २०१९ मध्ये पूरबाधित परिसर कमी झाला असता. तसेच धोकाही कमी झाला असता; परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे होऊ शकले नाही.

 

खानविलकर पेट्रोल पंप ते महावीर कॉलेज येथील स्थिती

  • ब्लू लाईनमध्ये बांधकाम ६०
  • रेड लाईनमध्ये बांधकाम ५५०
  • ग्रीन लाईनमध्ये बांधकाम १००० पेक्षा जास्त

 

Web Title: Construction in the red zone became a key issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.