बांधकाम क्षेत्राच्या विकासाला देणार गती : महेश यादव
By Admin | Published: May 18, 2017 05:46 PM2017-05-18T17:46:05+5:302017-05-18T17:46:05+5:30
सर्वांना एकत्रित घेऊन करणार काम; ‘क्रिडाई कोल्हापूर’चा निवडणूक आखाडा
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १८ : रेरा, जीएसटी, डी-क्लास नियमावली यांच्या पार्श्वभूमीवर आगामी दोन वर्षे बांधकाम व्यावसायिकांना आव्हानात्मक असणार आहेत. या पार्श्वभूमीवर बांधकाम क्षेत्र आणि कोल्हापूरच्या विकासाला गती देण्यासाठी ‘क्रिडाई कोल्हापूर’च्या माध्यमातून विविध उपक्रम राबविणार जातील. सर्वांना एकत्रित घेऊन काम करणार असल्याचे विद्यमान अध्यक्ष आणि श्री महालक्ष्मी क्रिडाई विकास आघाडीचे प्रमुख महेश यादव यांनी गुरुवारी सांगितले.
‘क्रिडाई कोल्हापूर’च्या द्वैवार्षिक निवडणुकीच्या रिंगणात श्री महालक्ष्मी क्रिडाई विकास आघाडी घेऊन ते उतरले आहेत. या आघाडीची भूमिका, आगामी योजना, उपक्रमांबाबत त्यांनी संवाद साधला.
आघाडी प्रमुख महेश यादव म्हणाले, बांधकाम क्षेत्र, व्यावसायिकांचे राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील प्रश्न सोडविण्यासाठी ‘क्रिडाई नॅशनल आणि क्रिडाई महाराष्ट्र’ कार्यरत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक पातळीवर ‘क्रिडाई कोल्हापूर’ सभासद, बांधकाम व्यावसायिकांच्या पाठीशी ठाम आहे. महानगरपालिका, एमएसईबी, तहसीलदार कार्यालय, नगररचना आदी कार्यालयांतील परवाना मिळविण्यातील अडचणी दूर करण्यासाठी संघटनेचा पाठपुरावा सातत्याने सुरू आहे. रियल इस्टेट अॅक्ट (रेरा), जीएसटी आणि डी-क्लासच्या नियमावली हे आगामी दोन वर्षांत बांधकाम व्यावसायिकांसमोरील मोठी आव्हाने आहेत. यातील ‘रेरा’ आणि जीएसटी करप्रणालीची माहिती देणारी शिबिरे घेतली जातील. सभासदांना देश-विदेशांतील बांधकाम क्षेत्रातील नवतंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले जाईल.
‘जीएसटी’ची टक्केवारी कमीत कमी राहावी आणि ‘डी-क्लास’मधील जाचक नियम रद्द करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. महानगरपालिका आणि नगररचना विभागातील परवाने मिळविण्याच्या प्रक्रियेतील टप्पे कमीत कमी करणे आणि ही प्रक्रिया आॅनलाईन व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे. ‘रेरा’अंतर्गत प्रत्येक बांधकाम व्यावसायिकांना आॅनलाईन नोंदणी करण्यासाठी संघटनेमध्ये स्वतंत्र कक्ष कार्यान्वित केला जाईल.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गृहप्रकल्पांची उभारणी करणे, स्टॅम्पड्युुटीमध्ये सवलत मिळविणे, ३० चौरस मीटरपर्यंतची सवलत ६० मीटरपर्यंत करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. राजारामपुरी येथील नगररचना विभागात बांधकाम व्यावसायिकांसाठी कक्ष सुरू करण्यास महानगरपालिकेने मंजुरी दिली आहे. त्याची पूर्तता करणे. सध्या असलेली १६ मजल्यांपर्यंत बांधकाम करण्याची परवानगी २१ मजल्यांपर्यंत वाढवून घेणे. महानगरपालिकेच्या हद्दीतील खुल्या जागा, उद्यानांचा विकास करणे. संघटनेचे कार्यालय प्रशस्त करुन ते अद्यावत करण्याचे आमचे नियोजन आहे. गेल्या दोन वर्षांत आम्ही केलेल्या कामाची शिदोरी आणि आगामी योजना, उपक्रमांतून बांधकाम क्षेत्र, व्यावसायिक आणि कोल्हापूरच्या विकासाला गती देण्याची भूमिका सभासद बांधव, मतदारांपर्यंत मांडत आहोत. या भूमिकेला मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
दोन वर्षांतील कामगिरी
गेल्या दोन वर्षांमध्ये आम्ही सभासद आणि कोल्हापूरकरांसाठी दालन गृहप्रदर्शन घेतले. पीएफ, जीएसटी, रेरा आणि डी-क्लासबाबत मार्गदर्शनपर तांत्रिक शिबिरे आयोजित केली. बी टेन्यूअर, एन. ए. बाबत जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली आहे. केआयटी कॉलेजसमवेत सामंजस्य करार केला आहे. सामाजिक बांधीलकी अंतर्गत निर्माण चौकात ५०० वृक्षांंचे रोपण, शहरात रस्ते विकास प्रकल्पांतर्गत लावण्यात आलेल्या झाडांना गेले वर्षभर पाणी देण्याचा उपक्रम राबविला आहे. जीवरक्षक दिनकर कांबळे यांना स्कुबा डायविंगचे प्रशिक्षण व साहित्य खरेदीसाठी आर्थिक मदत दिली आहे. नगररचना विभागात हेरिटेज कमिटीसाठीच्या कक्षाचे बांधणीचे काम आहे, असे आघाडीप्रमुख महेश यादव यांनी सांगितले. ते म्हणाले, या कामांसह विविध उपक्रमांमध्ये सभासदांचे पाठबळ महत्त्वाचे राहिले. त्यांनी आमच्या कामगिरीचे कौतुक देखील केले आहे.