बांधकाम व्यावसायिक अमृतलाल शहा यांना अटक

By admin | Published: April 25, 2016 12:27 AM2016-04-25T00:27:29+5:302016-04-25T00:56:55+5:30

धनादेश न वटल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई

Construction worker Amrit Lal Shah was arrested | बांधकाम व्यावसायिक अमृतलाल शहा यांना अटक

बांधकाम व्यावसायिक अमृतलाल शहा यांना अटक

Next

कोल्हापूर : चिकोडी (जि. बेळगाव) येथील एका बँकेच्या थकीत कर्जप्रकरणी धनादेश न वटल्याप्रकरणी वारंवार समन्स बजावूनही हजर न झाल्याने चिकोडी-बेळगाव न्यायालयाने काढलेल्या वॉरंटनुसार जुना राजवाडा पोलिसांनी कोल्हापुरातील आशापूरम डेव्हलपर्सचे बांधकाम व्यावसायिक अमृतलाल खेतमल शहा (वय ५१, रा. भक्तिपूजा नगर) यांना रविवारी अटक केली.
आशापूरम डेव्हलपर्सचे अमृतलाल शहा यांनी कर्नाटकपाठोपाठ कोल्हापुरातही हॉकी स्टेडियमसमोरील ७०९ अ येथील समावेशक आरक्षणातील ९०८.५० चौरस मीटर क्षेत्राचे देय असणारे बांधीव कार्यालय, दुकानगाळे महानगरपालिका प्रशासनास मुदतीत दिले नाहीत म्हणून महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी ५२ लाख ६५ हजार ६६६ रुपयांचा दंड केला आहे. शहा यांनी कोल्हापुरासह कर्नाटकात जागा विकसित केल्या आहेत.
कर्नाटकातील काही बँकांकडून घेतलेल्या कर्जप्रकरणातील रकमेचा धनादेश न वटल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात चिकोडी न्यायालयात खटला दाखल आहे. न्यायालयाने त्यांना हजर राहण्यासाठी वारंवार समन्स पाठवूनही त्यांनी दुर्लक्ष केले. या प्रकरणी न्यायालयाने त्यांना अटक वॉरंट काढून जुना राजवाडा पोलिसांना आदेश दिले होते. त्यानुसार रविवारी त्यांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांना आज, सोमवारी चिकोडी पोलिसांच्या ताब्यात देऊन न्यायालयात हजर केले जाणार आहे.
शहा यांनी महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी महिला व बालकल्याण समिती सभापती वृषाली कदम, नगरसेवक भूपाल शेटे यांनी मनपा आयुक्त शिवशंकर यांच्याकडे तक्रार करून समावेशक आरक्षणातील बांधकामाचा विषय उपस्थित केला होता. त्यानुसार आयुक्त शिवशंकर, सहायक संचालक नगररचना धनंजय खोत यांनी हॉकी स्टेडियमसमोरील रि.स. नं. ७०९ अ या मिळकतीची पाहणी केली आणि तक्रारीतील मुद्दे योग्य असल्याचे पाहून शहा यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. (प्रतिनिधी)


शहा भांबावून गेले
बांधकाम व्यावसायिक अमृतलाल शहा यांना पोलिसांनी रविवारी दुपारी अटक केली. त्यांना पोलिस ठाण्यातील कोठडीमध्ये ठेवले. आलिशान बंगल्यात राहणाऱ्या शहा यांनी दिवसभर कोठडीमध्येच
ताणून दिले.
त्यानंतर त्यांना राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या कोठडीमध्ये पोलिस घेऊन निघाल्यावर त्यांचे छायाचित्र काढण्यासाठी छायाचित्रकार पुढे सरसावले असता ते भांबावून गेले. पोलिसांना सोडून ते तोंड लपवत धावत बाहेर निघाले. यावेळी पोलिसांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी केली. त्यानंतर तोंडाला रूमाल बांधून ते पोलिस व्हॅनमध्ये बसले.

Web Title: Construction worker Amrit Lal Shah was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.