कामगारदिनी तिसऱ्या मजल्यावरून पडून बांधकाम कामगाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:18 AM2021-05-03T04:18:33+5:302021-05-03T04:18:33+5:30

कोल्हापूर : कामगार दिनी शनिवारी (दि.१) तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून एका बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्घटना ताराराणी चौकात घडली. ...

Construction worker dies after falling from third floor on Labor Day | कामगारदिनी तिसऱ्या मजल्यावरून पडून बांधकाम कामगाराचा मृत्यू

कामगारदिनी तिसऱ्या मजल्यावरून पडून बांधकाम कामगाराचा मृत्यू

Next

कोल्हापूर : कामगार दिनी शनिवारी (दि.१) तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून एका बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्घटना ताराराणी चौकात घडली. हॉटेल इमारतीचे बांधकाम सुरू असताना शनिवारी सकाळी ही घटना घडली. जालींदर कांबळे (३७, रा. पेंडाखळे, ता. शाहुवाडी) असे त्या दुर्दैवी कामगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ताराराणी चौकातील एका हॉटेलचे बांधकाम सुरू आहे. शनिवारी कामगार दिन असल्याने कामगारांना सुटी देण्याऐवजी या हॉटेलच्या इमारतीचे बांधकाम सुरू ठेवले. हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर जालींदर कांबळे हे काम करीत होते. त्यावेळी त्यांचा तोल गेल्याने ते तिसऱ्या मजल्यावरून खाली जमिनीवर कोसळले. या दुर्घटनेत ते गंभीर जखमी झाले. तेथील कामगारांनी त्यांना तातडीने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच मृताचे नातेवाईक व बांधकाम संघटनेचे कार्यकर्ते सीपीआर रुग्णालयाकडे धावले. रुग्णालय आवारात मोठी गर्दी होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी रुग्णालय आवारात धाव घेत गर्दी हटवली. यावेळी मृत जालींदरच्या नातेवाईकांनी रुग्णालय आवारात अक्रोश केला. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, तीन मुले, भाऊ असा परिवार आहे.

मृतदेह स्वीकारण्यास नकार

शनिवारी १ मे कामगार दिनाची सार्वजनिक सुटी असताना जालींदर कांबळे यांना कामावर बोलविल्यामुळेच त्याच्यावर मृत्यू ओढवला अशी भावना व्यक्त करीत संबधित हॉटेल व्यावसायिक व बांधकाम ठेकेदारावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवावा अशी मागणी बांधकाम कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी करीत सीपीआरमधील शवविच्छेदन केंद्रानजीक गोंधळ माजवला. जोपर्यंत गुन्हा नोंदविण्याची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली. नातेवाईक व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शवविच्छेदन विभागासमोर सुमारे तासभर ठिय्या आंदोलन केले. शाहुपुरी पोलिसांनी गुन्हा नोंदविण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

फोटो नं. ०२०५२०२१-कोल-जालींदर कांबळे

===Photopath===

020521\02kol_2_02052021_5.jpg

===Caption===

फोटो नं. ०२०५२०२१-कोल-जालींदर कांबळे

Web Title: Construction worker dies after falling from third floor on Labor Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.