'मध्यान्ह भोजन योजने'मुळे 'कामगारांना' बळ, रोज ५२ हजार जणांना कामाच्या ठिकाणी मिळतयं मोफत जेवण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 11:33 AM2022-02-04T11:33:05+5:302022-02-04T11:42:05+5:30
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना कोल्हापुरात गेल्या वर्षी जुलैमध्ये सुरू झाली.
संतोष मिठारी
कोल्हापूर : कोरोनाच्या कालावधीत बांधकाम कामगारांची जेवणासाठी होणारी हेळसांड थांबविण्यासाठी कामगार आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना कोल्हापुरात गेल्या वर्षी जुलैमध्ये सुरू झाली.
याअंतर्गत रोज दुपारी आणि रात्री असे दोन्ही वेळ जिल्ह्यातील ५२ हजार ३८८ नोंदीत आणि अनोंदीत बांधकाम कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी जेवण मोफत पुरविण्यात येत आहे. वेळेत, सकस जेवण मिळत असल्याने कामगारांचे आरोग्य सुदृढ राहण्यास त्यांना काम करण्यातील ऊर्जावाढीला बळ मिळत आहे.
शासनाच्या कामगार मंत्रालयातर्फे मध्यान्ह भोजन योजना राबविण्यात येत आहे. कोरोना काळात सर्व बांधकाम कामगारांना एका वेळच्या जेवणात बाराशे कॅलरीज मिळतील इतका आहार पुरविला जातो.
जिल्ह्यात दि. २ जुलै २०२१ रोजी मध्यान्ह भोजन योजनेची सुरुवात झाली. याअंतर्गत कबनूर येथील सेंट्रल किचनमध्ये रोज जेवण तयार करून ते दुपारी बारा ते एक आणि रात्री सात ते आठ यावेळेत बांधकाम कामगारांना देण्यात येते.
त्यात दुपारी २३७४४, तर रात्री २८६४४ कामगारांचा समावेश आहे. त्यामध्ये परप्रांतीय कामगारांचे प्रमाण अधिक आहे. भोजन योजनेमुळे बांधकाम कामगारांचे सध्या कोरोनाच्या काळात होणारे स्थलांतर कमी झाल्याने ही योजना उपयुक्त ठरली आहे.
असे आहे जेवण
तीन चपात्या, भाजी, भात, आमटी, लोणचे, सलाड, गुळाचा खडा असे जेवण हॉट कंटेनरमधून कामगारांना दिले जाते. दरम्यान, योजनेवर कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांचे विशेष लक्ष आहे. ते स्वत: कधीही अचानकपणे जेवणाचा दर्जा तपासतात, असे सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी सांगितले.
जिल्ह्यातील आकडेवारी दृष्टिक्षेपात
नोंदीत बांधकाम कामगार : १ लाख ३८ हजार
रोज जेवण पुरविण्यात येणाऱ्या कामगारांची संख्या : ५२ हजार ३८८
बांधकाम क्षेत्रातील एकूण आस्थापनांची संख्या : ६३४
जिल्ह्यातील नोंदीत, अनोंदीत अशा एकूण ५२३८८ बांधकाम कामगारांना रोज दुपारी, रात्री मोफत जेवण दिले जाते. त्याचे संयोजन कामगार आयुक्त कार्यालयातर्फे केले जाते. या योजनेमुळे कामगारांचे स्थलांतर कमी झाले असून, योजना उपयुक्त ठरली आहे. -अनिल गुरव, सहायक कामगार आयुक्त, कोल्हापूर
बांधकाम कामगारांसाठीची मध्यान्ह भोजन योजना चांगली आहे. ती उपयुक्त ठरली आहे. जेवण वेळेवर मिळते. मात्र, त्याचे वितरण करण्याची व्यवस्था आणखी सक्षम होणे आवश्यक आहे. -शिवाजी मगदूम, जिल्हा सचिव, लालबावटा संघटना