बांधकाम कामगारांची दोन हजारावरच बोळवण, संघटना नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 11:41 AM2020-04-21T11:41:29+5:302020-04-21T11:44:50+5:30
बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांची १५ हजारांची मागणी असताना राज्य सरकारने केवळ २ हजारांचेच अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेवून बोळवण केली आहे. ही कामगारांची खुशमस्करीच असल्याचा आरोप करत महाराष्ट्र बांधकाम कामगार फेडरेशन (सिटु) अंतर्गत सर्व बांधकाम कामगार संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दत्ता पाटील
म्हाकवे/कोल्हापूर : बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांची १५ हजारांची मागणी असताना राज्य सरकारने केवळ २ हजारांचेच अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेवून बोळवण केली आहे. ही कामगारांची खुशमस्करीच असल्याचा आरोप करत महाराष्ट्र बांधकाम कामगार फेडरेशन (सिटु) अंतर्गत सर्व बांधकाम कामगार संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राज्य सरकार व कल्याणकारी मंडळाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि कामगारांना ५ हजारांप्रमाणे पुढील तीन महिने दरमहा अर्थसहाय्य द्यावे अशी मागणी लाल बावटा बांधकाम कामगार संघटना (सिटू) यांनी केली आहे.
कामगार विभागाने नोंदीत कामगारांना दोन टप्प्यात ५ हजार रुपये देण्याचा राज्य सरकारला प्रस्ताव केला होता.परंतु आजच राज्य शासनाने राज्यातील सुमारे १२ लाखांहून अधिक नोंदीत बांधकाम कामगारांना २ हजार देण्याचा प्रस्ताव मंजूर करून या कामगारांचा अपेक्षा भंग केला आहे.
कल्याणकारी मंडळाकडे कोट्यवधीचा निधी असताना केवळ दोन हजारांचे अर्थसहाय्य करणे ही कामगारांची थट्टाच आहे. सध्या,काम नसल्यामुळे हे कामगार हवालदिल झाले आहेत.त्यामुळे माय-बाप सरकार आर्थिक हातभार लावतील या अपेक्षेने कामगार डोळे लावून होते. मात्र,आज त्यांची घोर निराशा झाली आहे.संचारबंदीमुळे न्यायहक्कासाठी रस्त्यावर उतरता येत नाही. याबाबत शासनाने फेरविचार करावा.
भरमा कांबळे
जिल्हाध्यक्ष, लाल बावटा