बांधकाम कामगारांची रविवारी सरकारविरोधात निषेध फेरी
By admin | Published: April 27, 2016 11:50 PM2016-04-27T23:50:21+5:302016-04-28T01:05:58+5:30
सरकारचे दुर्लक्ष : मागण्या मान्य न झाल्यास १६ मेपासून आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे
कोल्हापूर : बांधकाम कामगारांच्या मागण्यांबाबत भाजप सरकारने आश्वासनापलीकडे काहीच दिलेले नाही. दुष्काळात एकीकडे काम नाही आणि दुसरीकडे सुविधा देत नसेल तर सरकारच्या या भूमिकेचा निषेध करण्यासाठी रविवारी (दि. १) निषेध फेरी काढणार असल्याची माहिती लालबावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सरकारने मागण्यांकडे दुर्लक्षच केले तर दि. १६ मेपासून सहायक आयुक्त कार्यालयाच्या दारात बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
मेडिक्लेम योजना सरकारने बंद केली आहे. दिवाळीसाठी पाच हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. मंत्रालयावर मोर्चा काढला. पण श्रेयवादाच्या भूमिकेतून सरकार जाणीवपूर्वक या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. कामगार कल्याण मंडळाकडे ४८०० कोटी शिल्लक आहेत, वर्षाला व्याजापोटी ५०० कोटी रुपये मंडळाला उत्पन्न मिळते. कामगारांना सवलती द्यायच्या म्हटल्या तर व्याजही संपणार नाही पण सरकारची मानसिकता नसल्याने त्यांना जागे करण्यासाठी संघटनेने आक्रमक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून दि. १ मे रोजी काळा झेंडा घेऊन निषेध रॅली प्रत्येक तालुक्यातून काढण्यात येणार आहे यावेळी शिवाजी मगदूम, भगवानराव घोरपडे, प्रकाश कुंभार, संदीप सुतार, दत्ता गायकवाड, आदी उपस्थित होते.