कांद्याबरोबर तेलाच्या फोडणीचा ग्राहकांना चटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 03:43 PM2019-12-09T15:43:22+5:302019-12-09T15:45:32+5:30
गेली महिना-दीड महिना कांद्याने ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी आणले असताना, आता सरकी तेलाचा चटका सहन करावा लागत आहे. किरकोळ बाजारात सरकी तेलाचा दर प्रतिकिलो ९४ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या आठवड्याभरात भाजीपाल्याच्या दरात काही प्रमाणात घसरण झाली असून, वांगी २० रुपये किलोपर्यंत खाली आली आहेत.
कोल्हापूर : गेली महिना-दीड महिना कांद्याने ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी आणले असताना, आता सरकी तेलाचा चटका सहन करावा लागत आहे. किरकोळ बाजारात सरकी तेलाचा दर प्रतिकिलो ९४ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या आठवड्याभरात भाजीपाल्याच्या दरात काही प्रमाणात घसरण झाली असून, वांगी २० रुपये किलोपर्यंत खाली आली आहेत.
कांद्याने १५0 रुपये पार केल्याने स्वयंपाकातून कांदाच गायब झाला आहे. घाऊक बाजारात २० ते १५० रुपये प्रतिकिलो कांदा असला, तरी किरकोळ बाजारात ५० पासून पुढे कांद्याचा दर आहे. खराब कांदा ५० रुपयांनी घेण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. एक नंबर प्रतीच्या कांद्याला हात लावता येत नाही. बटाट्याचे दर मात्र स्थिर असून, २० रुपये किलो दर कायम राहिला आहे.
महापूर आणि त्यानंतर झालेल्या परतीच्या पावसाने सोयाबीनसह इतर तेलबियांची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. त्याचा परिणाम सध्या दिसत असून, सरकी तेलाच्या दरात वाढ झालेली आहे. गेल्या आठवड्यात किरकोळ बाजारात ८८ रुपये किलो असणारे तेल आता ९४ रुपयांवर पोहोचला असून, शंभरीकडे वाटचाल सुरू केली आहे. साखर ३८ रुपयांवर स्थिर असून, तूरडाळ १००, मूग डाळ १००, मूग ८८, मटकी १२० रुपये किलो आहे. ज्वारीच्या दरात वाढ होऊ लागली असून, प्रतिकिलो ४० रुपयांच्या पुढे दर पोहोचला आहे.
भाजीपाल्याचे दर आवाक्यात आले असून, किरकोळ बाजारात ८० रुपये किलोवर पोहोचलेल्या भाज्या ४० रुपयांवर आल्या आहेत. वांग्याचा दर ४० ते ६० रुपये किलो होता. तो आता २० ते ३० रुपयांवर खाली आला आहे. गवार ४० रुपये, ओला वाटाणा ५०, तर वरणा ४० रुपये किलो आहे. दोडका, ढब्बू, कोबीचे दर स्थिर आहेत. टोमॅटोच्या दरात घसरण झाली असून, बाजार समितीत रोज तीन हजार कॅरेटची आवक होते. हरभरा पेंढीबरोबरच हरभरा भाजीची आवकही वाढली आहे.
कोथिंबिरीच्या दरात घसरण
गेले महिनाभर कोथिंबिरीचा दर ५० रुपये पेंढीपर्यंत गेला होता. आता आवक वाढली असून, रविवारी बाजार समितीत २५ हजार पेंढ्यांची आवक झाल्याने दर घसरले. सध्या १0 रुपये पेंढी दर राहिला.
गेल्या चार-पाच वर्षांत सरकी तेलाच्या दरात एवढी वाढ पहिल्यांदाच झाली आहे. कांद्यासह डाळीचे दरही तेजीत असल्याने एकूणच व्यवसायावर परिणाम झाला आहे.
- संजय नाकील,
व्यापारी