Maharashtra Vidhan Sabha 2019 : रविकांत तूपकर सदाभाऊ खोत यांच्या संपर्कात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 01:58 PM2019-09-28T13:58:59+5:302019-09-28T14:01:36+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रामराम ठोकलेल्या रविकांत तूपकर यांनी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी संधान साधले आहे. त्यांना बुलढाण्यातून विधानसभेची उमेदवारी देण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत; पण ‘रयत’ऐवजी ‘कमळ’ या चिन्हावर निवडणूक लढविण्याची अट त्यांना घालण्यात आली आहे.
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रामराम ठोकलेल्या रविकांत तूपकर यांनी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी संधान साधले आहे. त्यांना बुलढाण्यातून विधानसभेची उमेदवारी देण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत; पण ‘रयत’ऐवजी ‘कमळ’ या चिन्हावर निवडणूक लढविण्याची अट त्यांना घालण्यात आली आहे.
स्वाभिमानी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यापूर्वी तूपकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे तूपकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती; पण शुक्रवारी तूपकर यांनी आपले एकेकाळचे सहकारी असलेले सदाभाऊ खोत यांच्याशी संधान साधले.
भाजपचा पर्याय मागे ठेवण्यामागे शुक्रवारी व्हायरल झालेला व्हिडीओ असल्याची चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिरोळमधील जाहीर सभेत तूपकर यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना उद्देशून ‘मी भाजपमध्ये येणार असल्याच्या खोट्या अफवा पसरवू नका. आत्महत्या करायची वेळ आली तरी भाजपमध्ये मरेपर्यंत जाणार नाही,’ असे वक्तव्य केले आहे. समाजमाध्यमांवरून या क्लिपने चांगलाच धुमाकूळ घातला.
सदाभाऊ खोत यांनी आज, शनिवारी बोलावलेल्या बैठकीला तूपकर यांना निमंत्रित केले आहे. त्यांनी चिखली अथवा बुलढाणा या जागा मागितल्या आहेत; पण चिखली हा मतदारसंघ भाजपकडे आहे, तर बुलढाण्यावर शिवसेनेने हक्क सांगितला आहे.
युतीच्या चर्चेत हा मतदारसंघ घटकपक्षांना सोडायचे ठरले तर येथून तूपकर यांना उतरविण्याची खेळी सदाभाऊ खोत यांनी खेळल्याची चर्चा आहे; पण भाजपने घटकपक्षांना जागा सोडतानाच ‘कमळ’ या चिन्हावरच निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला आहे.