वीज कनेक्शन तोडल्यास आमच्याशी गाठ-महावितरणला इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 06:28 PM2020-11-19T18:28:58+5:302020-11-19T18:30:01+5:30
mahavitran, kolhapurnews वीज बिल माफी हा सरकार आणि जनतेमधील संघर्ष आहे. तुम्ही त्या भानगडीत पडू नका, तुम्हाला संघर्ष झेपणार नाही; त्यामुळे वीज कनेक्शन तोडण्याची चूक करू नका; नाही तर गाठ आमच्याशी आहे, अशा शब्दांत राज्य इरिगेशन फेडरेशन व कृती समितीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना सुनावले. यावर मुख्य अभियंता सुधाकर निर्मळे यांनी शासन आदेश येईपर्यंत कोणाचेही वीज कनेक्शन तोडले जाणार नसल्याची ग्वाही दिली.
कोल्हापूर : वीज बिल माफी हा सरकार आणि जनतेमधील संघर्ष आहे. तुम्ही त्या भानगडीत पडू नका, तुम्हाला संघर्ष झेपणार नाही; त्यामुळे वीज कनेक्शन तोडण्याची चूक करू नका; नाही तर गाठ आमच्याशी आहे, अशा शब्दांत राज्य इरिगेशन फेडरेशन व कृती समितीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना सुनावले. यावर मुख्य अभियंता सुधाकर निर्मळे यांनी शासन आदेश येईपर्यंत कोणाचेही वीज कनेक्शन तोडले जाणार नसल्याची ग्वाही दिली.
लॉकडाऊन काळातील सहा महिन्यांची बिले माफ करण्याचे आश्वासन ऊर्जामंंत्र्यांनी दिले होते; पण आता ते वसुलीचा आदेश देत असल्याने जनतेमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. १८) सायंकाळी मिरजकर तिकटी येथे बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. याचा पहिला टप्पा म्हणून गुरुवारी दुपारी इरिगेशन फेडरेशनचे संपर्क प्रमुख विक्रांत पाटील-किणीकर, बाबासाहेब पाटील-भुयेकर, कृती समितीचे निवास साळोखे, बाबा इंदुलकर, दिलीप देसाई यांच्यासह कार्यकर्त्यानी ताराबाई पार्कातील महावितरण कार्यालयात जाऊन मुख्य अभियंता सुधाकर निर्मळे यांना निवेदन दिले.
यावेळी झालेल्या चर्चेत कोणत्याही परिस्थितीत वीज बिले भरणार नाही, यावर आम्ही ठाम आहोत. तुम्ही कनेक्शन तोडण्याची भाषा करणार असाल तर तीव्र संघर्ष अटळ असल्याचा इशाराही देण्यात आला. वीज बिल माफीचा विषय राज्य सरकार आणि जनता यांच्यातील आहे, यात महावितरणने पडण्याची चूक करु नये. मंत्री आणि अधिकारी मुंबईत बसतील; पण तुम्हालाच जनतेला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे वीज तोडण्याचा आत्मघातकी निर्णय महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घेऊ नये, अशी विनंतीही केली. आंदोलनात बाबा पार्टे, जयकुमार शिंदे, अशोक भंडारे, सतीश नलवडे, मारुती पाटील, आर. के. पाटील, चंद्रकांत पाटील यांनी सहभाग घेतला.