सरकार पाडू म्हणणाऱ्यांचे वीस आमदार संपर्कात
By admin | Published: February 20, 2017 12:59 AM2017-02-20T00:59:30+5:302017-02-20T00:59:30+5:30
चंद्रकांतदादा पाटील : ‘बिद्री’ची निवडणूक अजून दोन वर्षे नाही
गारगोटी : सरकार पाडून मध्यावधी निवडणुकीची धमकी देणाऱ्या पक्षाचे वीस-वीस आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. त्यामुळे सरकार पडण्याची भीती नाही. परंतु ज्यांनी ज्यांनी ऊस खाल्ला आहे, अशा सर्वांचा भ्रष्टाचार मुळासकट उपटून काढण्यात येणार आहे, असा घणाघात महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केला. गारगोटी येथील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचार सांगतेप्रसंगी हुतात्मा क्रांतिसिंह नाना पाटील चौकात घेण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई होते.
ज्या बिद्री कारखान्याच्या चिमणीभोवती या तालुक्याचे राजकारण फिरत आहे, त्या कारखान्याची निवडणूक किमान दोन वर्षे तरी होणार नाही. सतरा हजार सभासदांची तपासणी करण्यासाठी तेवढा वेळ लागणारच आहे. प्रशासकांमुळे टनाला दोनशे रुपये जादा दर मिळाल्याने शेतकरीही निवडणुकीपेक्षा प्रशासक बरे म्हणत आहेत, असेही चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.
केंद्रात भाजप सरकारच्या अनेक लोकोपयोगी योजनांची अंमलबजावणी योग्य रीतीने होण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर भाजपची सत्ता आवश्यक आहे, म्हणून भाजप आणि भाजप पुरस्कृत उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा, असेही ते म्हणाले.
यावेळी ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई म्हणाले, गेली पस्तीस वर्षे प्रलंबित असणारा सोनवडे-घोडगे घाट मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अवघ्या दोन महिन्यांत वन खात्याच्या मंजुरीसह भरघोस निधी मंजूर करून मार्गी लावला. अल्पावधीतच या घाटाचे काम मार्गी लागले. यावेळी योगेश परुळेकर, देवराज बारदेस्कर, प्रवीणसिंह सावंत यांनी मनोगते व्यक्त केली.
नाथाजी पाटील म्हणाले की, पक्षाचा झेंडा गुंडाळून ठेवून राधानगरीत काँग्रेस, आजरा तालुक्यांत ताराराणी आणि भुदरगड तालुक्यात पक्षच नाही अशी दुटप्पी भूमिका घेणाऱ्यांनी आमदार असल्याचा टेंभा मिरवू नये. यावेळी अलकेश कांदळकर, धनाजी मोरूस्कर, शक्तिजित पोवार, युवराज पाटील, नामदेव चौगले, अमर पाटील, दिलीप केणे, निवास देसाई, नामदेव कांबळे, दिगंबर देसाई यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी देवराज बारदेस्कर यांनी काढलेल्या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधले होते.