‘कंटेनर’ घोटाळ्यावरून सभा तहकूब
By admin | Published: April 20, 2017 01:22 AM2017-04-20T01:22:56+5:302017-04-20T01:22:56+5:30
महापालिका सभा : अधिकाऱ्यांनी ७० लाखांचा डल्ला मारल्याचा भूपाल शेटे, शारंगधर देशमुख यांचा आरोप
कोल्हापूर : लाखो रुपयांच्या घंटागाड्या खराब निघाल्यामुळे ज्या कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकले, अपात्र ठरविले त्याच कंपनीला १ कोटी १८ लाख रुपयांचा कंटेनर पुरविण्याचा ठेका दिला. एवढेच नव्हे तर पुरवठा केलेले कंटेनर खराब व हलक्या दर्जाचे असल्याने बिल अदा करू नये, अशी लेखी सूचना केली असताना त्यांचे बिल घाईगडबडीने अदा केले. अधिकाऱ्यांच्या टोळीचा जनतेच्या तिजोरीवरील हा डल्ला आहे, असा खळबळजनक आरोप करीत संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्याची मागणी नगरसेवक भूपाल शेटे, शारंगधर देशमुख यांनी महापालिका सभेत बुधवारी केली.
महापालिकेने तिरूपती ट्रेडर्स या नागपूरमधील कंपनीने ३९ हजार ७०० रुपये किमतीचे ३०० कंटेनरचा (कचरा कोंडाळी) पुरवठा केला; परंतु प्रत्यक्षात त्याची तपासणी केली असता प्रत्यक्षात १७ हजार रुपये एवढीच त्यांची किंमत असून, कंटेनर निविदेतील नमूद करण्यात आलेल्या ‘स्पेसिफिकेशन’प्रमाणे नाहीत. त्यामुळे या खरेदीत एका कंटेनरमागे २२ हजार ७०० रुपयांप्रमाणे ६५ ते ७० लाखांचा डल्ला मारण्यात आल्याचे सबळ पुरावेच भूपाल शेटे यांनी सभागृहात सादर केले. त्यावर अतिरिक्तआयुक्त श्रीधर पाटणकर, वर्कशॉप विभागाचे प्रमुख रावसाहेब चव्हाण अक्षरश: निरुत्तर झाले. समाधानकारक उत्तरे न दिल्यामुळे त्यांचा निषेध म्हणून ही सभाच तहकूब करण्यात आली.
याबाबत सभागृहात माहिती देताना भूपाल शेटे यांनी सांगितले की, ज्या कंपनीने घंटागाड्या खराब, कमी दर्जाच्या दिल्या त्याच कंपनीला कंटेनर पुरवठा करण्याचा ठेका कसा दिला याचे आश्चर्य वाटते. कंटेनरची किंमत, त्याचे वजन, त्याला वापरलेला पत्रा निविदेतील नमूद ‘स्पेसिफिकेशन’प्रमाणे नाही. रेल्वेच्या रुळासाठी वापरले जाणारे लोखंड
५२ रुपये किलो दराने मिळते; परंतु या कंटेनरसाठी ११७ रुपये किलो दराचे लोखंड वापरले गेले असल्याचे दाखविले आहे. प्रत्यक्षात वापरलेला पत्रा निकृष्ट दर्जाचा असून, तीन चार महिन्यांतच हे कंटेनर खराब होणार आहेत, असे शेटे यांनी निदर्शनास आणून दिले.
तिरूपती ट्रेडर्स या कंपनीला अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांनीच अपात्र ठरविले होते आणि आता त्यांनीच या खरेदीकरिता पात्र ठरविले. ते कसे आणि का ठरविले गेले याचा खुलासा खुद्द पाटणकर यांनीच करावा, अशी आग्रही मागणीही शेटे यांनी केली. त्याचा खुलासा पाटणकर यांना करता आला नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांचा निषेध करून ही सभा तहकूब करण्यात आली. शारंगधर देशमुख यांनी तहकुबीचा प्रस्ताव मांडला; परंतु महासभा संपवूया अशी विनंती सभाध्यक्ष महापौर हसिना फरास यांनी केली; पण किरण शिराळे, संतोष गायकवाड, राजसिंह शेळके, विजय खाडे, आदी सदस्यांनी सभा तहकूब करण्याचा आग्रह धरल्याने महापौरांचा नाइलाज झाला.
बिल अदा : पाटणकरांचा मनमानीपणा
ठेकेदाराला एक कोटी १८ लाखांचे बिल देण्याची प्रक्रिया सुरूहोण्यापूर्वी आपण स्वत: अतिरिक्त आयुक्तश्रीधर पाटणकर यांना वीस दिवस अगोदर ठेकेदाराचे काम निकृष्ट असल्यामुळे बिल अदा करू नये, अशी सूचना पत्र देऊन केली होती. तरीही त्यांनी खालच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून घाईगडबडीने बिल अदा केले. अतिरिक्त आयुक्त पाटणकर, रावसाहेब चव्हाण ही बोगस माणसं आहेत. ही माणसं चोर आहेत, असा घणाघाती आरोप शारंगधर देशमुख यांनी केला.
कंटेनरमध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी आहेत, त्या आता दुरुस्त करून घेणार का? अशी विचारणाही देशमुख यांनी केली. जोपर्यंत तुम्ही त्रुटी दूर करून घेत नाहीत, तोपर्यंत पाटणकर यांना कार्यालयात बसू देणार नाही, कामही करू देणार नाही, असा सज्जड इशाराही यावेळी त्यांनी दिला. अधिकाऱ्यांनी लुटायचे काम केल्याचे विलास वास्कर यांनी सांिगतले.
आयुक्तांच्या सहमतीने बिल अदा
ठेके दाराने दिलेल्या कंटेनरपैकी दोन कंटेनर निकृष्ट असल्याचे रावसाहेब चव्हाण यांनी कबूल केले. त्रुटी आहेत ते कंटेनर कंपनीकडून बदलून घेण्यात येतील, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले, तर वस्तुस्थिती आयुक्तांच्या कानावर घालून बिल अदा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली, असा खुलासा पाटणकर यांनी केला.