कोल्हापूर जिल्ह्यातील ७१ गावांत दूषित पाणी

By Admin | Published: February 5, 2016 12:45 AM2016-02-05T00:45:43+5:302016-02-05T00:51:25+5:30

जिल्हा पाणीपुरवठा व स्वच्छता अभियान विभाग बेफिकीर

Contaminated water in 71 villages of Kolhapur district | कोल्हापूर जिल्ह्यातील ७१ गावांत दूषित पाणी

कोल्हापूर जिल्ह्यातील ७१ गावांत दूषित पाणी

googlenewsNext

भीमगोंडा देसाई / कोल्हापूर
जिल्ह्यातील तब्बल ७१ गावांतील पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित आहेत. शुद्ध पाणी देण्याची व स्वच्छता राखण्याची जबाबदारी असलेला जिल्हा परिषदेमधील जिल्हा पाणीपुरवठा व स्वच्छता अभियान विभाग बेफिकीर असल्यामुळे अनेक महिन्यांपासून या गावांतील ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. या विभागातील अधिकारी कागदी घोडे नाचविणे, माहिती दडविणे यावर अधिक लक्ष केंद्रित करीत असल्याने शुद्ध पाणी देण्याकडे दुर्लक्ष होत आहे. याउलट आरोग्य विभाग पाणी उकळून, गाळून, शुद्ध करून प्या, असे आवाहन करीत जागृती करीत आहे.
मान्सूनपूर्व आणि नंतर असे वर्षातून दोन वेळा प्रत्येक गावातील जलस्रोतांमधील पाण्याचे नमुने पाणी व स्वच्छता विभागाच्या प्रशासनाकडून घेतले जातात. ते प्रयोगशाळेत तपासल्यानंतरच्या अहवालानंतर गावानिहाय शुद्ध पाणी मिळते किंवा नाही, याचा अहवाल तयार केला जातो. यंदा मान्सूननंतर केलेल्या तपासणीत जिल्ह्यातील तब्बल ७१ गावांत दूषित पाण्याचे स्रोेत असल्याचे स्पष्ट झाले. करवीर तालुक्यातील शिंगणापूर गावातील पाण्याचा एकही स्रोत पिण्यास लायक नसल्याचे समोर आले.
पाणी तपासणीचा हा अहवाल आरोग्य विभागाकडे देण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्या प्रशासनाने शुद्ध पाणी असलेल्या ग्रामपंचायतींना हिरवे, दूषित पाणी असलेल्या ग्रामपंचायतींना पिवळे, पिण्यास अयोग्य पाणी असलेल्या ग्रामपंचायतींना लाल कार्ड दिले आहे. केवळ पाण्याच्या स्रोतांची तपासणी करून आरोग्य विभागाकडे अहवाल दिल्यानंतर आपले काम झाले अशा भूमिकेत पाणी व स्वच्छता विभागाचे अधिकारी अजूनही आहेत. म्हणूनच ग्रामस्थांना महिनोन्महिने दूषित पाणी प्यावे लागत आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पाणीटंचाई निर्माण होत आहे. सध्या पाण्याची टंचाई भासत आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांनी पाणी व स्वच्छता, ग्रामीण पाणीपुरवठा विभागांचे अधिकारी यांच्याशी पाठपुरावा करून शुद्ध पाणी देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज ठळक झाली आहे.

Web Title: Contaminated water in 71 villages of Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.