तेरवाड पंचगंगा नदीत पुन्हा दूषित पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:21 AM2020-12-23T04:21:40+5:302020-12-23T04:21:40+5:30
कुरुंदवाड : पंचगंगा नदीला काळेकुट्ट रसायनयुक्त सांडपाणी आल्याने नदीतील मासे पाण्यातील आॉक्सिजनअभावी मृत्यू पावत आहेत. त्यामुळे तेरवाड (ता. ...
कुरुंदवाड : पंचगंगा नदीला काळेकुट्ट रसायनयुक्त सांडपाणी आल्याने नदीतील मासे पाण्यातील आॉक्सिजनअभावी मृत्यू पावत आहेत. त्यामुळे तेरवाड (ता. शिरोळ) बंधाऱ्यावर मृत माशांचा खच पडला असून, नदीकाठच्या नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर त्वरित कारवाई करावी, अन्यथा पंचगंगा काठच्या नागरिकांना घेऊन स्वाभिमानी स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी युवा आघाडी तालुकाध्यक्ष बंडू पाटील व विश्वास बालीघाटे यांनी दिला आहे. त्यामुळे नदी प्रदूषणावरुन वाद पेटण्याची शक्यता आहे.
लॉकडाऊनपासून गल्या दहा महिन्यांत पंचगंगा नदी काहीअंशी शुद्ध झाली होती. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून औद्योगिक कारखाने पूर्ववत सुरू झाल्याने कारखान्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम धाब्यावर बसवून विनाप्रक्रिया रसायनयुक्त सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने पंचगंगा नदी पुन्हा प्रदूषित झाली आहे. दोन दिवसांपूर्वी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या आदेशावरून पर्यावरण तज्ज्ञ सुनील भाटवडेकर यांनी दूषित पाण्याचे नमुने घेतले होते. त्यामुळे पाणी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई होणार अशी पंचगंगा काठच्या नागरिकांना आशा असताना दूषित पाण्यामुळे मासे मरत असल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
फोटो - २२१२२०२०-जेएवाय-०२
फोटो ओळ - तेरवाड (ता. शिरोळ) येथील पंचगंगा नदीपात्रात दूषित पाण्यामुळे मृत माशांचा खच पडला आहे.