बुद्धविचाराचे चिंतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:24 AM2021-05-26T04:24:41+5:302021-05-26T04:24:41+5:30
राम वाकरेकर आज कोरोना विषाणूच्या थैमानामुळे संपूर्ण जग हादरले आहे. हा विषाणू हद्दपार करण्यासाठी जगातील ...
राम वाकरेकर
आज कोरोना विषाणूच्या थैमानामुळे संपूर्ण जग हादरले आहे. हा विषाणू हद्दपार करण्यासाठी जगातील प्रमुख देश अथक प्रयत्न करताना दिसत आहेत. कोरोना हा विषाणू कोणी निर्माण केला या विषयी बरेच तर्क-वितर्क आहेत तथापि, हे सर्वांनाच मान्य करावे लागेल की, कोरोना विषाणूसारखे जैविक अस्त्र हे आगामी काळात मानवी समूहाला विनाशाच्या गर्तेत घेऊन जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. हे एक नवीन प्रकारचे अघोषित युद्धच आहे असे म्हणावे लागेल. हे युद्ध आपल्याला नियंत्रित करायचे असेल तर संपूर्ण विश्वाला आज बुध्दविचाराची गरज आहे. आज बुद्धजयंती दिवसाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी बुद्धविचारांची उपयोगिता विचारात घेऊन वाटचाल करणे गरजेचे आहे.
सिध्दार्थ गौतम यांच्या वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी त्यांच्या आयुष्यात एक अभूतपूर्व अशी घटना घडली. या घटनेने सिध्दार्थ गौतम यांच्या आयुष्याला कलाटणी दिली. त्यांच्या शाक्य राज्याच्या सीमेलगत कोलियांचे राज्य होते. ही दोनही राज्ये रोहिणी नदीमुळे विभागली गेली होती. रोहिणी नदीचे पाणी शेतीसाठी प्रथम कोणी घ्यावे यावरून दोन्ही राज्यांमध्ये नेहमी संघर्ष धुमसत असे. या संघर्षावरील कायम स्वरूपाचा तोडगा म्हणून शाक्य संघाने एक सभा बोलाविली आणि त्या सभेमध्ये शाक्य सेनापतीने कोलियांविरुध्द युध्द प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सिध्दार्थ गौतम यांनी विरोध दर्शविला. सिध्दार्थ गौतम स्वतः राजपुत्र असतानादेखील त्यांना युध्द नको होते. त्यांच्या मते, द्वेषाने द्वेष संपत नाही तर, द्वेष आणि वैर यावर प्रेमानेच मात करता येते. स्वतः क्षत्रिय असताना युद्धाला विरोध केल्यामुळे त्यांना संघाने सुनावलेली गृहत्यागाची शिक्षा स्वीकारावी लागली.
तथागत गौतम बुद्धांनी दुःखाचे अस्तित्व मान्य करून दुःखाचे कारण आणि दुःखमुक्तीचे उपाय यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात चिंतन केले. दुःखमुक्तीसाठी मानव समूहाने कोणत्या मार्गाने गेले पाहिजे याचा हयातभर त्यांनी प्रचार- प्रसार केला. आज प्रत्येक देश आर्थिक साम्राज्य विस्तारण्यासाठी प्रचलित निसर्गव्यवस्था नष्ट करू पाहत आहे. प्रत्येक देश आपल्याजवळील उपलब्ध नैसर्गिक साधनसामग्रीचा वारेमाप वापर करून निसर्गाला वेगळे वळण देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करताना दिसतो. भगवान बुद्धांनी सांगितलेल्या जीवनमार्गाचे जगातील सर्व लोकांनी पालन केल्यास युद्धे, दारिद्र्य, नैसर्गिक आपत्ती, अज्ञान, व्यसनाधीनता, व्यभिचार आणि गुन्हेगारी यासारख्या भीषण समस्या समाजव्यवस्थेतून नष्ट होतील.
आजसुद्धा जगात जात-पात, वर्ण, लिंग, वंश, गरीब- श्रीमंत आणि प्रांत यावरून मानव समाजातील मोठ्या घटकाला विकासापासून बाजूला केले जाते. हे सर्व रोखायचे असेल तर बुद्धांच्या समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुता आणि नीतिमत्ता या मार्गाचा स्वीकार करणे आवश्यक आहे. आजही जगात सर्वत्र वेगवेगळ्या देशातील संघर्ष, विविध समाजातील संघर्ष, अनेक व्यक्तींमधील संघर्ष आणि कौटुंबिक संघर्ष बेसुमार वाढत आहेत. हे संघर्ष केवळ तृष्णेतूनच निर्माण झाले आहेत. हे सर्व विविध आघाड्यांवरील संघर्ष नाहीसे करावयाचे असतील तर अडीच हजार वर्षांपूर्वी भारतवर्षातील महान सुपुत्र गौतम बुद्धांनी सांगितलेला पंचशील, अष्टांग मार्ग, प्रज्ञा, शील, करुणा, शांती, सत्य आणि अहिंसेच्या मार्गावरून वाटचाल करणे अपेक्षित आहे. आज वैश्विक मानवाचे आणि प्राणिमात्रांचे प्रामाणिक हितसंवर्धन साध्य करण्यासाठी बुद्धांची मैत्री पारमिता समजून घ्यावी लागेल की, जी मैत्री मनुष्यप्राणीच नव्हे सर्व जीवमात्राविषयी बंधुता ठेवण्याचा आग्रह धरते. कारण सध्या जग हे विविध आघाड्यांवरील संघर्षाने हैराण झाले आहे. आज कोणालाही संघर्ष नको, मैत्री हवी आहे, युध्द नको बुद्ध हवा आहे.