उमेदवारांच्या गावात मतदानासाठी चढाओढ
By admin | Published: April 23, 2017 05:01 PM2017-04-23T17:01:28+5:302017-04-23T17:01:28+5:30
सकाळी उत्साह, दुपारी मतदान केंद्रांवर निरव शांतता
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २३ : ‘भोगावती’ साखर कारखान्याच्या मतदानासाठी सकाळी उत्साह दिसत होता पण दुपारी बारानंतर सर्वच केंद्रांवर अक्षरश: निरव शांतता पसरली होती. दुपारनंतर वयोवृद्ध, आजारी व परगावाचे मतदान आणण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ पाहायला मिळाली. सकाळी लवकर मतदान करून शेतात जाण्याची धांदल सर्वच गावांत पाहावयास मिळाली. त्यामुळे सकाळी दहापर्यंत काही अपवादवगळता बहुतांशी केंद्रांवर गर्दी दिसत होती.
पहिल्या दोन तासांत ४० टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. दुपारी बारानंतर उन्हाचा तडाखा वाढू लागला तशी मतदान केंद्रे ओस पडू लागली. दुपारी दोनपर्यंत सर्वच केंद्रांवर अक्षरश: निरव शांतता होती. दुपारच्या पुढे राहिलेल्या मतदारांचा शोध कार्यकर्त्यांनी सुरू केला होता. कोणाचे मतदान राहिले, त्याचा पाठलाग करून मतदान करण्यासाठी धडपड सुरू होती. त्यासाठी प्रत्येक आघाडीने स्वतंत्र यंत्रणा केली होती. ज्या गावात उमेदवार आहे, तिथे ही यंत्रणा अधिक गतीने काम करताना दिसत होती.
सडोली खालसा, वाशी, हसूर, राशिवडे, कौलव, घोटवडे, ठिकपुर्ली येथे मतदानात कमालीची चुरस पाहावयास मिळाली. ज्या गावात कोणत्याही आघाडीचा उमेदवार नाही, तेथील वातावरण हलके-फुलके दिसत होते. तिन्ही आघाडीचे कार्यकर्ते एकत्रित गप्पा मारत मतदारांच्या प्रतीक्षेत बसलेले दिसत होते. भोगावती येथे बिगर उत्पादक गटातील मतदान झाले. संस्था प्रतिनिधींचे मर्यादित मतदान असल्याने ही प्रक्रिया वेगाने पूर्ण झाली.
कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी आमदार संपतराव पवार, कृष्णराव किरुळकर, धैर्यशील पाटील-कौलवकर, सदाशिवराव चरापले, अरुण डोंगळे आदी नेत्यांनी करवीर व राधानगरी तालुक्यांतील मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली.
एका केंद्रावर चार-पाच मतदान कक्ष!
२१ जागांसाठी ७४ उमेदवार रिंगणात होते. बिगर उत्पादक गटवगळता एका सभासदाला दहा मतपत्रिका दिल्या होत्या. त्यामुळे सहाजिकच मतदानासाठी वेळ लागणार म्हणून एका केंद्रात चार ते पाच मतदान कक्ष उभारले होते. परिणामी मतदान केंद्राबाहेर फारशा रांगा दिसत नव्हत्या.
शिरगांवमध्ये दीडपर्यंत ८२ टक्के
राधानगरी तालुक्यातील शिरगावमध्ये एका केंद्रावर दुपारी दीड वाजता २९६ पैकी २४२ मतदारांनी मतदान (८२ टक्के) झाले होते. येथे एका-एका मतासाठी तिन्ही आघाड्यांमध्ये झटापट सुरू होती. प्रत्येक गावात ५० ते १५० मतदार मृत कारखान्यासाठी ३० हजार ५१८ मतदान आहे; पण यातील सुमारे साडेतीन ते चार हजार सभासद मृत आहेत. प्रत्येक गावात जाईल त्या ठिकाणी ५० पासून १५० पर्यंत मृत सभासदांची यादीच कार्यकर्त्यांच्या हातात दिसत होती.
किसाबार्इंचे स्वालंबन!
हसूर दुमाला (ता. करवीर) येथील ऐंशी वर्षाच्या किसाबाई शंकर कांबळे एकट्याच मतदानासाठी आल्या होत्या. आजी तुमचे मतदान करतो म्हणून एक कार्यकर्ता धावला, पण त्याचा हात झटकून त्या म्हणाल्या, ‘मी काय आंधळी हाय, आजपर्यंत एकटीनेच मतदान केल्याचे’ सुनावल्यानंतर कार्यकर्ते तेथून पांगले.