कागलमधील विकासाचे पर्व सुरूच ठेवणार
By admin | Published: November 18, 2014 09:19 PM2014-11-18T21:19:50+5:302014-11-18T23:35:26+5:30
रोजगाराच्या संधी उपलब्ध करू : गडहिंग्लजला औद्योगिक वसाहत; नागनवाडी, आंबेओहळ प्रकल्प पूर्ण करणार
जहाँगीर शेख -- कागल -गेली १५ वर्षे कागल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असताना राज्याच्या मंत्रिमंडळातही ‘मंत्री’ म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या संधीचा उपयोग करीत मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. आता विरोधी पक्षाचा आमदार म्हणून काम करावे लागणार आहे.
गडहिंग्लज येथे औद्योगिक वसाहत उभारणे, नागनवाडी, आंबेओहळ प्रकल्प पूर्ण करणे, मतदारसंघातील उपेक्षित गोरगरीब जनतेला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे आणि जनतेच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करणार असल्याचे माजी जलसंपदा मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
मतदारसंघात विकासाची कामे मोठ्या प्रमाणात झालेली आहेत. त्यांची देखभाल, दुरुस्ती ठेवण्यालाही प्राधान्य द्यावे लागेल. मतदारसंघातील कागल, मुरगूड, गडहिंग्लज, उत्तूर अशा काही मोठ्या गावांचा विस्तार होत असल्याने हा नियोजनबद्ध विस्तार व्हावा यासाठी आमदार म्हणून लक्ष देणार आहे. मंत्रिपदाच्या व्यापातून वेळ काढून विकासात्मक कामांचा आढावा घेत होतो. आता हा व्याप नसल्याने अधिक बारकाईने लक्ष देता येईल.
नागनवाडी प्रकल्पाचे काम निधीअभावी रखडलेले नाही. जमीन संपादनाच्या कामी अडचणी आल्या आहेत. दूधगंगा कालव्याच्या कामातही हीच अडचण आहे. ती दूर करून हे प्रकल्प येत्या पाच वर्षांत पूर्ण करणार आहे. गडहिंग्लजमधील औद्योगिक वसाहत एका कंपनीच्या न्यायालयीन वादामुळे रखडली आहे. तो वाद सोडवून येथे कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीप्रमाणे मोठे उद्योग निमंत्रित करण्यासाठी वेळ देणार आहे. कागलजवळून गेलेल्या महामार्ग चौपदरीकरण रस्त्याच्या कामात काही त्रुटी राहिल्या आहेत. आता सहापदरीकरण कामाला सुरुवात होणार आहे. त्यामध्ये या त्रुटी दूर करण्यात येतील. मतदारसंघातील सर्व रस्ते दळणवळणाच्या दृष्टीने सुसज्ज केलेले आहेत. आता त्यांची देखभाल करण्याकडे लक्ष देणार आहे.
मुश्रीफ फौंडेशनच्यावतीने यापूर्वी जसे विविध सामाजिक उपक्रम राबविले, तसे उपक्रम यापुढेही राबविले जातील. मतदारसंघातील बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर माझा विशेष भर असेल. कामगार आणि विशेष साहाय्य खात्याच्या माध्यमातून राज्यपातळीवर काही महत्त्वाकांक्षी निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी केली, नियमावली बदलली, काही कायदेही केले. यामुळे राज्यातील लाखो गरीब, उपेक्षित आणि कष्टकरी जनतेला त्याचे लाभ मिळत आहेत. त्यांना अधिक आत्मसन्मान मिळत आहे. मतदारसंघातील जनतेलाही हा लाभ मोठ्या प्रमाणात मिळवून दिला आहे. आता विरोधी पक्षाचा आमदार म्हणून या योजना पूर्वीप्रमाणे चालत राहाव्यात, त्यावर कोणते निर्बंध येऊ नयेत यासाठी मी जागरूकपणे सत्ताधारी पक्षावर लक्ष ठेवण्याचे काम पाच वर्षे करणार आहे. त्यासाठी विधानसभेत आणि विधानसभेच्या बाहेर रस्त्यावर संघर्ष करावा लागला तरी मी तो करणार आहे. ज्या मोफत उपचार शस्त्रक्रिया योजनेमुळे मला राज्यभर प्रसिद्ध मिळाली, ते काम यापुढेही चालू राहील. मात्र, आता सत्तेवर नसल्याने मला मर्यादा येणार आहेत.
(उद्याच्या अंकात आमदार सुरेश हाळवणकर)
आमदार हसन मुश्रीफ
माझा अजेंडा...!
आता मर्यादा
सत्तेवर असल्याने मी माझा कर्मचारीवर्ग यासाठी नेमला होता. माझा मंत्रिपदाचा बंगला, आमदार निवास येथे रुग्णांचे नातेवाईक राहतील, अशी व्यवस्था केली होती.
आता दुसरीकडे व्यवस्था करावी लागणार आहे. शक्य होईल तितका प्रयत्न करणार आहे; पण जनतेनेही या काही मर्यादा समजून घेऊन सहकार्य करावे, असे आवाहनही मी ‘लोकमत’च्या माध्यमातून करीत आहे.
होय ! यासाठी आग्रही
विविध शासकीय योजना : विविध शासकीय योजनांचे लाभ यापुढेही गरीब, उपेक्षित घटकांना कायमपणे मिळत राहतील याकडे लक्ष.
औद्योगिक प्रकल्पांना प्राधान्य : गडहिंग्लज येथे पूर्ण क्षमतेने औद्योगिक वसाहत तसेच मुरगूड परिसरात एखादा औद्योगिक प्रकल्प सुरू होण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील.
हरितक्रांती : कागल विधानसभा मतदारसंघातील मोठे क्षेत्र आज जलसिंचनामुळे ओलिताखाली आहे. उर्वरित क्षेत्रही ओलिताखाली आणून हरितक्रांती घडविणार.
आरोग्य सुविधा : कागल येथील ग्रामीण रुग्णालयात ट्राम केअर सेंटर, मुरगूड, गडहिंग्लज आणि मतदारसंघातील शासकीय आरोग्य यंत्रणा सक्षम करून जनतेला आरोग्य सुविधा देणार.
क्रीडांगणे : कागल, गडहिंग्लज, मुरगूड येथे सुसज्ज क्रीडांगणे तसेच मतदारसंघातील प्रमुख गावांत क्रीडांगणे उभारणार.