स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यास हवे अभ्यासात सातत्य

By Admin | Published: June 10, 2015 11:45 PM2015-06-10T23:45:56+5:302015-06-11T00:17:00+5:30

आवड, क्षमतेनुसारच करिअर निवडा : जॉर्ज क्रूझ

Continuation in the study to be successful in the competition exam | स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यास हवे अभ्यासात सातत्य

स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यास हवे अभ्यासात सातत्य

googlenewsNext

दहावी-बारावीचे निकाल लागल्याने सध्या करिअरचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत, करिअरसाठी क्षेत्र निवडताना कोणती दक्षता घ्यावी, स्पर्धा परीक्षा क्षेत्रात करिअर करता येईल का, यातील परीक्षांची कशी निवड करावी, त्यासाठी काय लक्षात घ्यावे, असे अनेक प्रश्न पालक, विद्यार्थ्यांसमोर आहेत. अशा स्थितीत करिअर निवड, स्पर्धा परीक्षा क्षेत्रांतील संधी, तयारीबाबत परीक्षा क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रा. जॉर्ज क्रूझ यांच्याशी साधलेला हा थेट संवाद...

प्रश्न : करिअरचे क्षेत्र निवडताना काय लक्षात घ्यावे?
उत्तर : दहावी, बारावीनंतर ‘करिअर’ या शब्दाकडे गांभीर्याने पाहिले जाते. करिअर निवडताना मुलाच्या टक्केवारीवर अधिक भर दिला जातो. असे न करता आपल्या मुलाची आवड लक्षात घेऊन आणि पाचवी ते बारावीचा त्याचा शालेय प्रवास व त्यातील गुणवत्ता विचारात घेऊन प्रथम घरच्या घरी दोन ते तीन मार्ग निवडावेत. त्यानंतर संबंधित अभ्यासू आणि माहीतगार व्यक्तीचे मार्गदर्शन घेऊन निवड केलेल्या करिअरच्या दहा वर्षांनंतर कोणत्या संधी आहेत? आपण कोणत्या पदापर्यंत जाऊन पोहोचू शकतो. मात्र, सन्मान आणि कामाचे समाधान आपणास हवे तसे मिळणार का? या गोष्टींचा जरूर विचार करावा.
प्रश्न : स्पर्धा परीक्षांमधील क्षेत्र कसे निवडावे?
उत्तर : स्पर्धा परीक्षा हे सध्या करिअरसाठी उत्तम क्षेत्र आहे. यातील विविध शाखांची करिअरसाठी निवड करताना आपल्या मुलाला समाजामध्ये मिसळण्याची आवड आहे का? समाजातील प्रश्नांचे ज्ञान आहे का? त्याला जनसंपर्काची आवड आहे का? एखादे पद त्याला खुणावत असेल तर त्याविषयी त्याला आवड आहे का? अथवा तो त्यासाठी धडपड करतो का? या प्रश्नांची उत्तरे पहिल्यांदा तपासून घ्या. स्पर्धा परीक्षेत करिअर करताना प्रामुख्याने इंग्रजी, गणित, बुद्धिमापन आणि विज्ञान या विषयांची तयारी चांगली असायला हवी. या क्षेत्रात करिअर करावयाचे असल्यास तयारीची सुरुवात दहावी, बारावीपासूनच करावी. शालेय पुस्तके, वर्तमानपत्रांचे वाचन करावे.
प्रश्न : स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी?
उत्तर : स्पर्धा परीक्षा म्हटले की, प्रामुख्याने यूपीएससी (केंद्रीय लोकसेवा आयोग) आणि एमपीएससी (राज्य लोकसेवा आयोग) डोळ्यांसमोर येते. यासमवेत बँक, पीओ, एलआयसी, सीडीएस, एनडीए, बँक क्लार्क, फूड टेक्नॉलॉजी, पीएसआय, उपशिक्षणाधिकारी, महिला व बालकल्याण, समाजकल्याण विभाग, आदींमध्ये करिअर करता येते. सर्वसाधारणपणे या सर्व परीक्षांमध्ये गणित, इंग्रजी, बुद्धिमापन चाचणी हे प्रामुख्याने असतात. सर्वप्रथम आपण जी परीक्षा देणार आहोत, तिचा अभ्यासक्रम सखोलपणे जाणून घ्यावा. पूर्वी झालेल्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करावा. जे विषय अवघड वाटतात त्याबद्दल तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घ्यावे. या परीक्षांची तयारी करताना सॉफ्ट स्किलला विशेष महत्त्व द्यावे. त्यासह संभाषण कौशल्य, संगणकज्ञान, नेतृत्वगुण विकसित करावेत. या परीक्षांतील यशासाठी ‘अभ्यासातील सातत्य’ महत्त्वाचे आहे.
प्रश्न : स्पर्धा परीक्षेतील यशाचा टक्का वाढण्यासाठी काय अपेक्षित आहे?
उत्तर : यात पालकांनी मुलाची आवड लक्षात घेऊन त्यानुसार त्याला पुढील करिअरची माहिती द्यावी. विद्यार्थ्यांना शालेय पातळीवरच स्पर्धा परीक्षांची तोंडओळख व्हावी. प्रत्येक शाळा, महाविद्यालयात अद्ययावत आणि सुसज्ज ग्रंथालये व्हावीत. शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध क्षेत्रांतील वक्त्यांची मार्गदर्शनपर चर्चासत्रे, व्याख्याने, परिसंवाद आयोजित करण्यात यावेत. शासकीय ग्रंथ भांडारातून विविध विषयांची जुनी, नवीन पुस्तके उपलब्ध व्हावीत. पालक, शाळा आणि शासनाकडून अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना बळ मिळणे अपेक्षित आहे.
प्रश्न : तरुणाईला काय संदेश द्याल?
उत्तर : माहिती तंत्रज्ञानामुळे जग एक खेडे झाले आहे. सर्व
क्षेत्रांत तरुणाईला करिअरची दारे सर्वांसाठी खुली झाली आहेत. तुम्ही गुणवत्ता द्या. तुम्हाला काही कमी पडणार नाही. प्रामाणिकपणे आणि दूरदृष्टी ठेवून आपले काम करा.
खरे ज्ञान म्हणजे कल्पनाशक्ती
आहे. त्यामुळे तिचा वापर करून विविध संधी निर्माण करा. त्यासाठी अधिक वाचन करा. एखादी संकल्पना आवडल्यास त्यात स्वत:ला झोकून द्या. चांगली माणसे
आणि चांगली पुस्तके या दोन
गोष्टीच आयुष्य बदलू शकतात आणि घडवू शकतात. त्यांचा
शोध घ्या आणि स्वत:ला
पहिल्यांदा बदला.
- संतोष मिठारी

Web Title: Continuation in the study to be successful in the competition exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.