‘गोकुळ’ची निवडणूक प्रक्रिया सुरू ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:27 AM2021-04-28T04:27:42+5:302021-04-28T04:27:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) निवडणूक मतदान केंद्रांची संख्या दुप्पट करून निवडणूक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) निवडणूक मतदान केंद्रांची संख्या दुप्पट करून निवडणूक प्रक्रिया सुरूच ठेवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. न्यायमूर्ती उदय ललित व न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय यांच्या खंडपीठासमाेर सुनावणी पूर्ण झाली. उच्च न्यायालयापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयातही सत्तारूढ गटाला झटका बसला आहे.
काेल्हापूर जिल्ह्यात काेरोनाचे रुग्ण वाढत असल्याने ‘गोकुळ’ची निवडणूक प्रक्रिया स्थगित करावी, यासाठी सत्तारूढ गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने ती फेटाळून लावल्यानंतर रवींद्र पाटील (कसबा तारळे) व आनंदा चौगुले (शिरगाव) यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी होऊन यामध्ये राज्य सरकारला म्हणणे मांडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी सरकारने न्यायालयात म्हणणे सादर केले.
पंढरपूर विधानसभा निवडणुकीनंतर तिथे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याचे मत सत्तारूढ गटाच्या वकिलांनी मांडले. त्याचबरोबर कोल्हापुरात कोरोनाचे रुग्ण वाढत असून ‘गोकुळ’च्या दोन ठरावधारकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ४० मतदार काेरोनाबाधित असल्याचे सत्तारूढ गटाच्यावतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
त्यावर राज्यात गेल्या आठवड्यापेक्षा ४० टक्क्याने रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यातच ‘गोकुळ’चे ३६५० मतदार असून ३५ केंद्रांवर मतदान घेतले जाणार आहे. पंढरपूर विधानसभा व कृष्णा साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे. मतदानासाठी पाच दिवस राहिले असून मार्गदर्शक नियमावलीनुसार निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याचे म्हणणे राज्य सरकारच्यावतीने न्यायालयात मांडण्यात आले.
यावर, मतदान केंद्रांची संख्या दुप्पट करून ‘गोकुळ’ची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे गेला दीड महिना निवडणुकीबाबत अस्पष्टतेच्या तयार झालेल्या वातावरणाला पूर्णविराम मिळाला.
उच्च न्यायालयापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयानेही निवडणूक सुरू ठेवण्याचे आदेश दिल्याने हा सत्तारूढ गटाला झटका मानला जात आहे.