सहा महिन्यांसाठी ट्रेलर पासिंग सुरू
By Admin | Published: June 16, 2017 10:46 PM2017-06-16T22:46:54+5:302017-06-16T22:46:54+5:30
२८ टक्के जीएसटी रद्द करावा
सतीश पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क शिरोली : ट्रेलर पासिंगला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली. त्यामुळे ट्रेलर पासिंग पूर्ववत झाले आहे. याबाबतचा अध्यादेश लवकरच निघणार आहे. ट्रेलर पासिंगला दिलेली एक वर्षाची मुदत ३१ डिसेंबर २०१६ला संपली होती. २०१७ मध्ये एक जानेवारीपासूनच ट्रेलरचे पासिंग बंद झाले होते. ट्रॅक्टर ट्रेलरच्या अपघातात वाढ झाल्याने केंद्र शासनाने सन २००९ मध्ये ट्रेलरला ब्रेक लावणे सक्तीचे केले, अन्यथा ट्रेलर पासिंग बंद, असा लेखी आदेश वाहतूक आणि प्रादेशिक परिवहन आयुक्तांनी काढला होता.
ट्रॅक्टर ट्रेलरच्या अपघातातील प्रमाण कमी व्हावे यासाठीच हा आदेश शासनाने काढला. ट्रेलर उद्योजकांनी ट्रेलरला हायड्रोलिक ब्रेक यंत्रणा बसवावी असे कारण पुढे आणले व राज्यातील पासिंग बंद झाले; पण अॅग्रिकल्चरल इम्प्लिमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अनेकदा परिवहनमंत्री, कृषिमंत्री यांची भेट घेऊन ट्रेलर पासिंग तात्पुरते सुरू करून आणले. आताही ‘आयमा’चे अध्यक्ष प्रकाश बागुल, सचिव नरेंद्र पाटील, ट्रेलर उद्योजक दत्तात्रय हजारे, युवराज चौगुले यांनी दिल्लीला जाऊन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन ट्रेलर विक्रीचा हंगाम सुरू होणार आहे. गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले ट्रेलर पासिंग सुरू करावे, अशी मागणी केली. यावर गडकरी यांनी सहा महिन्यांत ट्रॅक्टर कंपन्यांना ब्रेक सप्लाय पॉर्इंट काढण्याचा आदेश देतो, तोपर्यंत सहा महिन्यांकरिता ट्रेलर पासिंग पूर्ववत सुरू करू, असे आश्वासन दिले. यावेळी ट्रेलर उद्योजकांनी आम्ही ट्रेलरला ब्रेक यंत्रणा बसवायला तयार आहोत; पण ट्रॅक्टर कंपन्या ब्रेक पॉर्इंट काढायला तयार नाहीत. यावर गडकरी यांनी सहा महिन्यांत ट्रॅक्टर कंपन्यांनी ब्रेक पॉर्इंट काढल्यावर ट्रेलर उद्योजकांनीही ट्रेलरला ब्रेक यंत्रणा बसवावी, असे शिष्टमंडळाला सांगितले.
२८ टक्के जीएसटी रद्द करावा
चारचाकी ट्रेलरचा समावेश अवजड वाहनात केला असून, एक जुलैपासून ट्रेलर खरेदीवर २८ टक्के जीएसटी लागणार आहे. ट्रेलर हे शेती, शेतकरी वर्गाशी निगडित वाहन आहे. २८ टक्के जीएसटीचा भार शेतकऱ्यांसाठी पडणार आहे. तरी ट्रेलरचा समावेश शेती औजारे विभागात करून २८ टक्के जीएसटी कमी करून शेती औजाराप्रमाणे जीएसटी आकारणी करावी, याबाबतचे निवेदन मंत्री नितीन गडकरी यांना ‘आयमा’च्या शिष्टमंडळाने दिल्लीत दिले.
गेल्या सहा महिन्यांपासून ट्रेलर पासिंग बंद होते. अॅग्रिकल्चरल इम्प्लिमेंट असोसिएशनने (आयमा) दिल्लीला जाऊन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पुन्हा ट्रेलर पासिंग सुरू करून आणले आहे; पण हे पासिंग सहा महिन्यांपर्यंत सुरू राहणार आहे.
- युवराज चौगुले, उद्योजक
ट्रेलर पासिंगला सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाल्याने राज्यातील पाच हजार ट्रेलर उद्योगांना नवसंजीवनी मिळाली आहे. ट्रेलर विक्रीचा हंगाम सुरू होणार आहे. ट्रेलर पासिंग सुरू झाल्याने शेतकऱ्यांना वेळेत ट्रेलर मिळतील.
- दत्तात्रय हजारे, उद्योजक