वाहतूक नियमांच्या उल्लंघनात महिला पुढे
By admin | Published: April 20, 2017 06:13 PM2017-04-20T18:13:45+5:302017-04-20T18:13:45+5:30
दोन दिवसांत तीन हजार जणांवर कारवाई : दंडाच्या रुपाने सहा लाखांपेक्षा अधिक रक्कम वसूल
आॅनलाईन लोकमत
गणेश शिंदे / कोल्हापूर : शहर पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत केलेल्या मोहिमेत तब्बल तीन हजार वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. संबंधितांना केलेल्या दंडाच्या माध्यमातून सरकारी तिजोरीत ६ लाखांपेक्षा अधिक महसूल जमा झाला असून वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यात तरुणांसह महिलाही पुढे असल्याची धक्कादायक माहिती या कारवाईतून पुढे आली आहे.
शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहर वाहतूक नियंत्रण शाखा रस्ता सुरक्षा अभियानाबरोबर महाविद्यालय स्तरावर वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करते; पण, या वाहतुकीचे नियम पाळल्याचे दिसत नाही. त्याचबरोबर दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्याही त्यामागे एक कारण आहे.त्यामुळे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे -पाटील यांना शहर वाहतूक शाखेतर्फे विशेष मोहीम राबवून स्वत: रस्त्यावर उतरावे लागले.
ही मोहीम सोमवारी (दि. १७) व मंगळवारी (दि. १८) राबविली. यासाठी विशेषत : दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, कोंडा ओळ लक्ष्मीपुरी, जनता बझार राजारामपुरी, सायबर चौक, टेंबलाईवाडी उड्डाण पूल, क्रशर चौक, सीपीआर चौक, दाभोळकर कॉर्नर, ताराराणी चौक (कावळा नाका), धैर्यप्रसाद हॉल चौक, शिरोली टोलनाका, गोखले कॉलेज चौक या प्रमुख चौकांसह महालक्ष्मी मंदिर चौक, खरी कॉर्नर, बिंदू चौक (दुर्गा हॉटेल) आदी ठिकाणी निवडण्यात आली.
पहिल्या दिवशी मोहिमेत एकूण १८८२ केसेसमधून सुमारे तीन लाख ७७ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल झाला. दुसऱ्या दिवशी या मोहिमेची धास्ती नागरिकांनी घेतली. मंगळवारी (दि. १८) १११७ केसेसमधून दोन लाख २३ हजार ६०० रुपये दंडात्मक कारवाईमधून असे एकूण सहा लाख ९०० रुपये शासनाच्या तिजोरीत जमा झाले. यासाठी वाहनधारकांकडून कमीत कमी दोनशे रुपयांपासून आणि त्यापुढे दंड असा आकारण्यात आला.
प्रामुख्याने तोंडाला स्कार्फ लावून जाणे, झेब्रा क्रॉसिंग तोडणे, ट्रिप्पल सीट जाणे, वाहन नियंत्रित न चालवणे, असे सर्रास प्रकार महिलांकडून होत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, याबाबत पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्याशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.
रस्ता सुरक्षा अभियानाला तडा...
दरवर्षी एक ते १५ जानेवारी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते. त्याचाच भाग म्हणून प्रशासन महाविद्यालयासह वाहतूक शाखेकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. पण, सप्ताहानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी वाहतूक नियमांची पायमल्ली करण्यास सुरुवात होते, असे आजपर्यंतचे चित्र आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाला अशा प्रकारच्या विशेष मोहीम राबवाव्या लागत आहेत.
यांच्यावर कारवाईचा बडगा...
वाहन परवाना नसणे
ट्रिपल सीट जाणे
जादा वेगाने वाहन चालवणे
मोबाईलवरून बोलणे
झेब्रा क्रॉसिंग तोडणे
या कारवाईसाठी एवढा दंड...
हेल्मेट न घालणे : ७०० रुपये
मोबाईलवर बोलणे : ५०० रुपये
वाहन परवाना नसणे, झेब्रा क्रॉसिंग तोडणे आदी : प्रत्येकी २०० रुपये
असे होते मनुष्यबळ...
वाहतूक शाखेच्या पोलिस अधिकाऱ्यांसह ७३ कर्मचारी
पोलिस मुख्यालय : ५० कर्मचारी, त्यामध्ये दहा महिला पोलिस कॉन्स्टेबल प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक अधिकाऱ्यांसह कर्मचारी