समूह अध्यापनातून शैक्षणिक विकासात सातत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:23 AM2020-12-29T04:23:18+5:302020-12-29T04:23:18+5:30

खोची(आयुब मुल्ला) : विद्यार्थ्यांच्या अभ्यासात सातत्य राहण्यासाठी लाटवडे येथील संस्कार शाळेने पाच गावांत समूह अध्यापनाचा नवा उपक्रम प्रभावीपणे ...

Continuity in educational development through group teaching | समूह अध्यापनातून शैक्षणिक विकासात सातत्य

समूह अध्यापनातून शैक्षणिक विकासात सातत्य

Next

खोची(आयुब मुल्ला) : विद्यार्थ्यांच्या अभ्यासात सातत्य राहण्यासाठी लाटवडे येथील संस्कार शाळेने पाच गावांत समूह अध्यापनाचा नवा उपक्रम प्रभावीपणे राबविला आहे. यामुळे ज्ञानार्जनातून शिक्षणाचा अखंड जागर सुरू आहे. या उपक्रमास विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. तसेच या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

कोरोनाच्या संकटामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे शैक्षणिक वर्षाचे काय होणार असे म्हणत अनेक महिन्यांचा कालावधी लोटत चालला आहे. अजूनही पहिली ते नववीच्या शाळा सुरू होण्याचा मुहूर्त कधी हे स्पष्ट झालेले नाही.

अशा परिस्थितीत संस्कार शाळा मात्र विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी प्रयत्नशील राहिली. ग्रामीण भागात असूनही ऑनलाईन अभ्यासावर जोर दिला. डिसेंबर महिन्याच्या प्रारंभापासून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करीत समूह अध्यपनाचा उपक्रम सुरू केला.

लाटवडे, भेंडवडे, खोची, भादोले, पेठवडगाव या गावांतील सुमारे साडेचारशे विद्यार्थी १ ते ७ पर्यंत या शाळेत आहेत. या प्रत्येक गावात सकाळी दहा ते दुपारी या वेळेत ३० विद्यार्थ्यांना दोन गटांत एकत्रित केले जाते. मास्क, सॅनिटायझर, योग्य अंतर याचे पालन करून एका ठिकाणी वेगवेगळ्या वर्गातील विद्यार्थी एकत्रित येतात. त्यांना मार्गदर्शनासाठी एक शिक्षक असतो. ते त्यांच्याकडून अभ्यास करून घेतात. प्रश्नांना उत्तरे देतात. त्यामुळे शाळेत जसे शैक्षणिक वातावरण असते तसाच अनुभव विद्यार्थ्यांना येत आहे.

गावातील ज्या ठिकाणी मुलांना एकत्र येण्यास अंतर जवळ असेल, बसण्यासाठी मोठी जागा उपलब्ध असेल अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना बोलावले जाते. तेथे दोन विभागांत अभ्यासाचे धडे गिरवले जातात. रोजचा रोज अभ्यास पूर्ण करून घेतला जातो. विशेष म्हणजे ५० स्वअध्ययनाचे कार्ड उपलब्ध करून दिले जाते. याचा चांगला उपयोग होतो.

शाळा व्यस्थापन समिती, पालक यांच्या संवादातून हा उपक्रम राबविला जात आहे. पालकांकडून संमतीपत्रे लिहून घेतली आहेत. शाळेच्या सर्व १५ शिक्षकांची कोरोना चाचणी करून घेण्यात आली. या उपक्रमाने विद्यार्थ्यांत गुणात्मक वाढ होण्यास मदत होत असून पालकांची वाहवा मिळविली आहे. यासाठी एम. बी. पाटील यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे. याचे नियोजन स्वतः मुख्याध्यापक भाग्यश्री पाटील करीत आहेत.

Web Title: Continuity in educational development through group teaching

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.