दुर्गमानवाडची बॉक्साईट वाहतूक सुरू
By Admin | Published: December 25, 2014 10:21 PM2014-12-25T22:21:26+5:302014-12-26T00:54:16+5:30
लोकमत इफेक्ट--दररोज १७० ट्रक भरण्याचा व १५ जानेवारीपर्यंत कामगारांचाही प्रश्न मार्गी लावून त्यापुढे दररोज २५० गाड्या भरण्याची सोय होईल,
सरवडे : राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड येथील हिंडाल्को कंपनी व तेथील मशीन कामगार यांच्यातील वादाचा फटका सुमारे ४०० ट्रकमालकांना बसत होता. त्यामुळे बॉक्साईट वाहतूक असोसिएशनच्यावतीने वाहतूक बंद करण्यात आली होती. यावर हिंडाल्को कंपनीचे अधिकारी, ट्रकमालक असोसिएशनचे पदाधिकारी व ट्रान्स्पोर्टधारकांची बैठक झाली. त्यामध्ये १७० ट्रक भरण्याचे ठरल्यानंतर व अन्य काही सकारात्मक चर्चा झाल्याने दुर्गमानवाडची बॉक्साईट वाहतूक पुन्हा सुरू झाली.
यावर्षी १७० ट्रान्स्पोर्ट नावाने ४०० ट्रक बॉक्साईट वाहतूक करीत आहेत. अलीकडे अतिरिक्त माल नेण्याचे बंद केले असून, प्रत्येक ट्रकमधून दहा टनच बॉक्साईट वाहतूक होत होती. कंपनीच्या मशीनवर काम करणाऱ्या २० कामगारांना पगारवाढ हवी होती. त्या वादातून ते ट्रक भरण्यास टाळाटाळ करीत होते. त्यामुळे केवळ शंभर ट्रकच भरले जात होते. त्यामुळे ट्रक मालकांचा व ट्रान्स्पोर्ट चालकांचाही तोटा होत होता. पर्यायाने ट्रकमालक असोसिएश्नच्यावतीने बॉक्साईट वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यासंबंधी शनिवारी (दि. २०) ‘लोकमत’मधून ‘हिंडाल्को कंपनी आणि कामगार वादात चारशे ट्रकना फटका’ बॉक्साईट वाहतूक बंद या शिर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे कंपनी ट्रकमालक व ट्रान्स्पोर्टर यांची बैठक बोलविण्यात आली आणि सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीत दररोज १७० ट्रक भरण्याचा व १५ जानेवारीपर्यंत कामगारांचाही प्रश्न मार्गी लावून त्यापुढे दररोज २५० गाड्या भरण्याची सोय होईल, असा निर्णय झाला.