लोकशाहीला पुढे नेण्यासाठी सातत्याने शिक्षण, जागृती आवश्यक : जे. एस. सहारिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 04:56 PM2019-03-05T16:56:23+5:302019-03-05T17:06:08+5:30
सातत्याने शिक्षण, प्रयत्न, जागृती या त्रिसूत्रीचा आधार घेऊन लोकशाहीला पुढे घेऊन जाणे महत्त्वाचे ठरणारे आहे, असे प्रतिपादन राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी मंगळवारी येथे केले.
कोल्हापूर : सर्वांना समान संधी, एकसमान वागणुकीसाठी लोकशाही आग्रही असते. वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्याच्यादृष्टीने लोकशाहीत विचारमंथन आणि प्रयत्न होणे अपेक्षित असते. त्यासाठी सातत्याने शिक्षण, प्रयत्न, जागृती या त्रिसूत्रीचा आधार घेऊन लोकशाहीला पुढे घेऊन जाणे महत्त्वाचे ठरणारे आहे, असे प्रतिपादन राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी मंगळवारी येथे केले.
शिवाजी विद्यापीठातील नेहरू अभ्यास केंद्र, राज्यशास्त्र अधिविभाग आणि राज्य निवडणूक आयोगाची इन्स्टिट्यूट आॅफ डेमोक्रसी अॅन्ड इलेक्शन फॉर गुड गव्हर्नन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राच्या उदघाटनप्रसंगी त्यांचे बीजभाषण झाले.
‘भारतीय लोकशाहीची वाटचाल (१९५०-२०१९)’ असा चर्चासत्राचा विषय होता. विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. राज्य निवडणूक आयुक्त सहारिया म्हणाले, लोकशाही ही निरंतर प्रक्रिया आहे; तिचे संरक्षण व संवर्धन ही प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे. लोकसभा व विधानसभा यांच्या निवडणुका ही जशी केंद्रीय निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे, त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ही राज्य निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे.
महाराष्ट्रापुरता विचार करावयाची झाल्यास इथे लोकसभेच्या ४८, विधानसभेच्या २८८ तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तीन लाखांहून अधिक जागा आहेत. आणि या तीन लाख जागांसाठी सुमारे तीस लाख उमेदवार उभे राहात असतात. या आकडेवारीवरुन राज्य निवडणूक आयोगावरील जबाबदारीची जाणीव होऊ शकेल. मुक्त, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात निवडणुका पार पाडणे ही आयोगाची महत्त्वाची जबाबदारी आहे. त्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने अनेक अभिनव उपक्रम राबविलेले आहेत.
यामध्ये नामनिर्देशन व शपथपत्रांचे सादरीकरण शंभर टक्के आॅनलाइन स्वरुपात करवून घेणारे महाराष्ट्र देशातले एकमेव राज्य आहे. यामुळे एक तर उमेदवारांना त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार अर्ज करता येतात आणि दुसरे म्हणजे अर्ज बाद होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, सर्वसमावेशकता हा लोकशाहीचा गाभा आहे. मतदारांचा विवेक हा लोकशाहीच फार महत्त्वाचा ठरतो. योग्य उमेदवार निवडण्यासाठी लोकशाहीच्या पद्धतीपेक्षा लोकशाहीचा संस्कार महत्त्वाचा ठरतो. शिवाजी विद्यापीठ निवडणूकविषयक जागृती, नवमतदार नोंदणी आणि लोकशाहीविषयक अभ्यासक्रम आदी उपक्रमांकडे लोकचळवळ म्हणून पाहते आहे.