पावसाची संततधार, चांदोली धरण पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 11:35 AM2022-07-05T11:35:11+5:302022-07-05T11:37:04+5:30
चांदोली धरणामध्ये सध्या 11.46 टीएमसी इतका पाणीसाठा
शित्तुर वारूण (कोल्हापूर) : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने काल, सोमवारपासून दमदार हजेरी लावली आहे. आज, मंगळवारी सकाळपासूनही पावसाची संततधार कायम आहे. यामुळे धरणक्षेत्रातीलपाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर असल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
चांदोली वारणा धरण क्षेत्रात गेल्या 24 तासात जोरदार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासात 85 मिमी पावसाची नोंद वारणावती पर्जन्य मापक केंद्रात झाली असून धरणामध्ये सध्या 11.46 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. एकूण क्षमतेच्या 33.29 टक्के झाला आहे. धरणाची एकूण क्षमता 34.40 टीएमसी इतकी आहे. धरणात सध्या 7289 क्यूसेसने पाणीसाठा वाढत आहे. 600 क्यूसेस पाणी जलविद्युत केंद्रातून बाहेर पडत आहे तसेच वारणा नदीच्या पाणीपातळी मध्ये झपाट्याने वाढ होत आहे.
हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित व मालमत्तेची हानी होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी NDRF जवानांना तसेच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.