Rain Update Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा संततधार, पंचगंगेची पाणी पातळी ३२.०७ फुटावर
By राजाराम लोंढे | Published: July 11, 2022 02:21 PM2022-07-11T14:21:28+5:302022-07-11T14:22:20+5:30
राधानगरी धरण ५७ .६७ टक्के भरले. धरणातून वीजनिर्मितीसाठी प्रतिसेंकद १३५० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू
कोल्हापूर : जिल्ह्यात आज, सोमवारी सकाळ पासून पावसाची पुन्हा संततधार सुरु झाली आहे. धरणातून वीजनिर्मितीसाठी विसर्ग सुरु असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदीची पातळी ३२.०७ फुटावर पोहचली आहे. गगनबावड्यासह पश्चिमेकडील सर्वच तालुक्यात जोरदार पाऊस कोसळत असल्याने पाणी पातळीत वाढ होऊ शकते.
काल, रविवारी दुपारनंतर पावसाने काहीसी उसंत घेतली होती. त्यामुळे नद्यांची पातळी हळूहळू कमी होत जात असतानाच आज सकाळ पासून पावसाचा जोर पुन्हा वाढला. एक सारखा पाऊस कोसळत असल्याने हवेत गारठा पसरला आहे. नद्यांचे पाणी वाढत असल्याने जिल्ह्यातील ४० बंधारे पाण्याखाली आहेत. त्यामुळे वाहतूक काहिसी विस्कळीत झाली आहे.
धरणक्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असून, राधानगरी धरणातून वीजनिर्मितीसाठी प्रतिसेंकद १३५० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
राधानगरी धरण ५७ .६७ टक्के भरले
गेल्या आठवड्याभरापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. सध्या धरणामध्ये १२४.७२ दघलमी पाणीसाठा आहे. आज सकाळी सात वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून १३५० क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात ४.४० टीएमसी पाणीसाठा आहे. धरणक्षेत्रात ९७. मी.मी इतका पाऊस झाला आहे. तर एकुण पाऊस १२०४ मी. मी झाला आहे. आज अखेर धरण ५७.६७ टक्के भरले आहे.
तुळशी जलाशयात १.६८ टीएमसी पाणीसाठा असून धरण ५१.२५ टक्के भरले आहे. दूधगंगा धरणामध्ये ११.०१ इतका पाणी साठा असून ४३.३६ टक्के धरण पाणीसाठी आहे. आज सकाळ पासून राधानगरी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर जुलै अखेर धरण भरण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा
तुळशी ५०.३७ दलघमी, वारणा ४९८.४४ दलघमी, दूधगंगा ३११.८० दलघमी, कासारी ४७.८४ दलघमी, कडवी ३७.८५ दलघमी, कुंभी ४२.४० दलघमी, पाटगाव ५५.९१ दलघमी, चिकोत्रा २२.९३ दलघमी, चित्री २३.९९ दलघमी, जंगमहट्टी १८.५० दलघमी, घटप्रभा ४४.१७ दलघमी, आंबेआहोळ २२.२५, जांबरे मध्यम प्रकल्प व कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.