कंत्राटी सफाई कामगार, रुग्णवाहिका चालकांचे साडेचार कोटी थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:31 AM2021-06-16T04:31:30+5:302021-06-16T04:31:30+5:30
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांकडील कंत्राटी सफाई कामगार आणि रुग्णवाहिकांच्या चालकांचे ...
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांकडील कंत्राटी सफाई कामगार आणि रुग्णवाहिकांच्या चालकांचे गेल्या तीन वर्षातील साडेचार कोटी रुपये मानधन थकले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे या निधीची मागणी करण्यात आली आहे.
सन २०१९/२० या कालावधीत ७६ कंत्राटी सफाई कामगार प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे कार्यरत होते. त्यावेळी त्यांना ४ हजार १५० रुपये मासिक मानधन होते. अशा ७६ कामगारांचे ४१ लाख रुपये थकीत आहेत. याच सर्वांचे सन २०२०-२१ मधील ३७ लाख ८४ हजार रुपये थकीत आहेत. त्याच्या पुढच्या वर्षी त्यांच्या मानधनाचा दर वाढला. हे मानधन १२ हजार ४८८ इतके झाले. त्यासाठी १ कोटी १३ लाख ८९ हजार रुपयांची गरज आहे.
याच कालावधीत ५५ कंत्राटी रुग्णवाहिका चालकांचे प्रतिमहिना ११ हजार ९०० प्रमाणे १ कोटी ७२ लाख ८ हजार रुपये थकीत आहेत. सन २०२०/२१ मध्ये २२ लाख ३३ हजार रुपये प्राप्त झाले. परंतु ही अल्पशी रक्कम होती. आता तर २०२२ हे वर्ष सुरू असून अजूनही पूर्ण मानधन मिळालेले नाही.
हे कामगार आणि चालक यांच्या मानधनापोटी मार्च २२ अखेर एकूण ४ कोटी ४७ लाख ८६ हजार रुपये मानधन थकीत आहे. जरी ठेकेदारांकडून सध्या या कामगारांना मानधन मिळत असले तरी शासनाकडून निधी वेळेत येत नसल्याने त्यांचीही कुचंबणा झाली आहे. गेल्या दोन वर्षांत अनेकदा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने याबाबत प्रस्ताव पाठवला, परंतु त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यामध्ये लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे.
चौकट
कोरोना काळात महत्त्वाची कामगिरी
गेल्यावर्षीपासून कोरोना काळात या सर्वांनीच महत्त्वाची कामगिरी बजावली असून स्वच्छतेचे आणि रुग्णांची वाहतूक करण्याचे काम या कामगारांनी केले. त्यांच्या मानधनापोटीची ही रक्कम थकल्याने पुरवठादारही अडचणीत आले आहेत.