कंत्राटी वीज कामगारांचे आंदोलन कायम
By admin | Published: May 24, 2017 12:39 AM2017-05-24T00:39:09+5:302017-05-24T00:39:09+5:30
विविध संघटनांचा पाठिंबा : ‘बेमुदत काम बंद’ चा दुसरा दिवस
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : विविध प्रलंबित मागण्यांसाठी कंत्राटी वीज कामगारांचे ‘बेमुदत काम बंद’ आंदोलन मंगळवारी कायम राहिले. दिवसभरात विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन या कामगारांच्या लढ्याला पाठिंबा दिला.
राज्यातील कंत्राटी वीज कामगारांनी केलेल्या विविध मागण्या शासनदरबारी प्रलंबित आहेत. यामध्ये रानडे समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करावी, कंत्राटी पद्धत बंद करावी, रोजंदारी कामगार पद्धती पुन्हा राबवावी, कामावरून कमी केलेल्या कंत्राटी कामगारांना विनाविलंब कामावर घ्यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे. त्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र कंत्राटी वीज कामगार संघाने बेमुदत काम बंद आंदोलन सोमवार (दि. २२) पासून सुरू केले. यात जिल्ह्यातील सुमारे पाचशे वीज कंत्राटी कामगार सहभागी झाले आहेत. त्यांनी ताराबाई पार्क येथील ‘महावितरण’च्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मारला आहे. त्यांचे आंदोलन मंगळवारी कायम राहिले. त्यांनी या ठिकाणी मागण्यांच्या अनुषंगाने घोषणा देत निदर्शने केली. भारतीय मजूर संघाचे केंद्रीय सदस्य रमेश थोरात, विष्णू जोशीलकर, भारतीय वीज कामगार संस्थेचे एकनाथ जाधव, वर्कर्स फेडरेशनचे कृष्णात तांबेकर, शकील महात, संदीप बच्चे, सर्जेराव विभूते, आदींनी आंदोलनस्थळी भेट देऊन या कामगारांच्या लढ्याला पाठिंबा दिला आहे, अशी माहिती संघाचे जिल्हा सचिव लोहार यांनी दिली.
कामकाज कोलमडले
संघाने पुकारलेल्या आंदोलनात सुमारे पाचशे कामगार सहभागी झाल्याने जिल्ह्यातील महापारेषण, महावितरणच्या विद्युतवाहिन्यांची दुरुस्ती, बिलांचे वितरण आणि वसुली, असे विविध स्वरूपांतील कामकाज कोलमडले असल्याचे संघाचे जिल्हा सचिव लोहार यांनी सांगितले.
यासाठी आंदोलनाचा निर्णय
तिन्ही वीज कंपन्यांमध्ये ३२ हजार कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना सेवाज्येष्ठतेप्रमाणे कायम कामगार म्हणून सामावून घ्यावे. रोजगाराची हमी मिळावी, आदींपैकी एकही मागणी व्यवस्थापनाने मान्य केली नाही; त्यामुळे हे आंदोलन करावे लागले असल्याची माहिती कंत्राटी आऊटसोर्सिंग कामगार संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी दिली.