ठेकेदाराने भरले चक्क २८ लाख
By admin | Published: June 16, 2015 01:03 AM2015-06-16T01:03:49+5:302015-06-16T01:15:43+5:30
जांभूळवाडीतील पेयजलचा घोटाळा : राजकीय दबाव; पुढील कारवाईकडे लक्ष
कोल्हापूर : जांभूळवाडी (ता. गडहिंग्लज) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेतील गैरव्यवहार प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. या योजनेत गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेल्या ठेकेदाराने २८ लाख ज्या खात्यावरून काढले, त्या खात्यावरच पैसे भरले आहेत. हे पैसे भरलेल्याचा अहवाल जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे पाठविला आहे. कठोर कारवाई टाळण्यासाठीच पैसे भरले आहेत. मात्र, पैसे भरल्याने गैरकारभार, चुकीच्या कारभाराची, ‘ढपल्या’ची अप्रत्यक्षपणे कबुली दिली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे जिल्ह्णाचे लक्ष लागून राहिले आहे.
जांभूळवाडी गावातील या पाणी योजनेसाठी एक कोटी १५ लाख मंजूर झाले होते. या योजनेत कंत्राटदारासह काही अधिकाऱ्यांवर गैरव्यवहाराचा ठपका आहे. काम न करताच कंत्राटदारास ४३ लाख अदा केल्याची तक्रार ग्रामस्थ बाजीराव देसाई यांनी केली आहे. तक्रारीनंतर वेळोवेळी पाठपुरावा केला, आंदोलने, मोर्चा काढला. मात्र, ठेकेदाराला राजकीय आश्रय असल्याने ठोस कारवाई होत नव्हती. तसेच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत होता.
दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासनाने याची चौकशी करण्यासाठी जी. डी. कुंभार यांची नियुक्ती केली. कुंभार यांनी चौकशी करून योजनेतील गैरव्यवहाराचा अहवाल सादर केला.
अहवालात कंत्राटदार तानाजी शेंडगे यांना अदा केलेल्या ४३ लाखांमधील २८ लाखांची कामेच झाली नसल्याचे पुढे आले. तसेच विहीर खुदाई, वाळू, आरसीसी पाईप, कॉफर डॅम, स्ट्रेंच गॅलरी साहित्य यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे अहवालातून स्पष्ट होते.
हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर ७ जूनला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अविनाश सुभेदार यांनी कंत्राटदार, अभियंता, सरपंच, पाणीपुरवठा समिती सदस्य यांना नोटीस दिल्यामुळे खळबळ माजली. कुंभार यांनी दिलेल्या अहवालावरून ढपला पाडल्याचेही समोर आले.
त्यामुळे ठेकेदार शेंडगेंसह नोटीस दिलेल्या सर्वांवर कारवाई अटळ आहे. ही कारवाई टाळण्यासाठी शेंडगेने शिष्टमंडळाला घेऊन अधिकाऱ्यांना साकडेही घातले आहे.
तसेच प्रशासनाने कारवाईच्या नोटिसीचा दणका देताच शेंडगे यांनी २८ लाख रुपये ज्या खात्यावरून काढले होते, त्या खात्यावरच जमा केल्याचा अहवाल त्यांनी दिला आहे. कारवाईतून सुटका करून घेण्यासाठीच त्यांनी पैसे भरले आहेत. मात्र, पैसे भरून चुकीची कबुलीही अप्रत्यक्षपणे दिली आहे. परिणामी, कारवाईसाठी पैसे भरल्याचा आयता, भक्कमपणे पुरावा प्रशासनाला मिळाला आहे. (प्रतिनिधी)
जांभूळवाडी पाणी योजनेचे ठेकेदार तानाजी शेंडगे यांनी २८ लाख रुपये भरल्याचा अहवाल दिला आहे. ठपका असलेल्यांना नोटीस दिली असून, कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
- एस. एस. शिंदे,
कार्यकारी अभियंता,
ग्रामीण पाणीपुरवठा विभाग.
तालुक्यात खळबळ...
गडहिंग्लज तालुक्यातील आणखी काही गावांतील पाणी योजनेत ढपला पाडला आहे. राजकीय वरदहस्त असतानाही जांभूळवाडी पाणी योजनेतील ठेकेदारांसह दोषींना कारवाईची नोटीस दिल्यामुळे अन्य गावांतील पाणी योजनांत ढपला पाडलेल्यांमध्ये खळबळ माजली आहे. त्यांनी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली असून, आपल्याबद्दल कोणीही तक्रार करू नये, याची विशेष काळजी घेतली जात आहे.