कनिष्ठ अभियंत्यासह ठेकेदार ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:22 AM2020-12-23T04:22:39+5:302020-12-23T04:22:39+5:30
२२१२२०२०-आयसीएच-०९ (अमोल कणसे) २२१२२०२०-आयसीएच-१० (हारूण इब्राहीम) लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : कबनूर (ता. हातकणंगले) येथील महावितरणचा कनिष्ठ अभियंता आणि ...
२२१२२०२०-आयसीएच-०९ (अमोल कणसे)
२२१२२०२०-आयसीएच-१० (हारूण इब्राहीम)
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : कबनूर (ता. हातकणंगले) येथील महावितरणचा कनिष्ठ अभियंता आणि सरकारी इलेक्ट्रिकल ठेकेदार अशा दोघांना पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. अभियंता अमोल बाळासाहेब कणसे (वय ४०, रा. अवधुत आखाडा) व ठेकेदार हारूण रशिद इब्राहीम (४०, रा. आवळे चौक) अशी त्यांची नावे आहेत.
कबनूर येथील एका फर्निचर व्यावसायिकाने आपल्या व्यवसायासाठी वीज जोडणीचा अर्ज महावितरणला केला होता. त्या जोडणीसाठी ठेकेदार हारुण याने स्वत:साठी तीन हजार रुपये व अभियंता कणसे याच्यासाठी दोन हजार रुपये लाच मागितली होती. त्यामुळे संबंधित फर्निचर व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूरकडे तक्रार केली होती. त्यानुसार पथकाने मंगळवारी दुपारच्या सुमारास भारत इलेक्ट्रिकल या दुकानात सापळा लावला व तेथे ठेकेदार इब्राहीम याला पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. त्यानंतर कणसे याला कबनूरच्या महावितरण कार्यालयातून ताब्यात घेतले.
कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक आदिनाथ बुद्धवंत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक युवराज सरनोबत, शरद कोरे, नवनाथ कदम, विकास माने, सुनील घोसाळकर या पथकाने ही कारवाई केली.