शाहू जन्मस्थळाच्या कामाला मिळेना ठेकेदार-- वादाचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 01:24 AM2017-10-06T01:24:20+5:302017-10-06T01:24:58+5:30
कोल्हापूर : पुरातत्त्व खात्याच्या अटींचे बंधन आणि प्रकल्पाला लागलेली वादाची किनार यामुळे राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळाच्या वस्तुसंग्रहालयाच्या कामांसाठी ठेकेदार मिळेना, अशी अवस्था
इंदूमती गणेश।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पुरातत्त्व खात्याच्या अटींचे बंधन आणि प्रकल्पाला लागलेली वादाची किनार यामुळे राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळाच्या वस्तुसंग्रहालयाच्या कामांसाठी ठेकेदार मिळेना, अशी अवस्था झाली आहे. तीनवेळा निविदा प्रसिद्ध करूनही ठेकेदारांचे अर्ज न आल्याने अखेर पुरातत्त्व खात्याच्यावतीने संग्रहालयाचे काम करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे.
कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळाच्या विकासाचे काम सन २०११ मध्ये सुरू झाले. येथे साकारण्यात येणाºया संग्रहालयासाठी इतिहास संशोधकांच्या मंडळाने
१५ कोटींच्या आराखडा तयार केला. त्यातील पहिल्या टप्प्यासाठी
दोन कोटींची रक्कम तातडीने वर्गही करण्यात आली. हा निधी संग्रहालयासाठीच्या ‘राखीव निधी’तून देण्यात आला आहे.
वर्ग झालेल्या दोन कोटींत संग्रहालयाचे प्राथमिक काम करण्यात येणार आहे. शाहूंच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित प्रसंग म्युरल्सच्या माध्यमातून दाखविण्यात येणार आहेत. चित्र-शिल्प बनविण्यासाठी कलाकारांकडून आधी क्ले मॉडेल्स करून घ्यावी लागणार आहेत. या कामाचा ठेका देण्यासाठी पुरातत्त्व खात्याच्यावतीने तीनवेळा निविदा प्रसिद्ध करण्यात आली आणि दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली. मात्र, केवळ एका ठेकेदाराने या कामाची निविदा भरली आहे. शासनाच्या नियमानुसार किमान तीनजणांनी अर्ज करणे गरजेचे असते. सुरुवातीला शासकीय अनास्था, नंतर ठेकेदाराची दिरंगाई, चुकीच्या पद्धतीने झालेले काम आणि त्यावर शाहू जन्मस्थळ समितीने केलेली उघड टीका या सगळ्या वादाची किनार या प्रकल्पाला लागल्याने ठेकेदार हे काम करण्यासाठी पुढे येत नाहीत. समितीच्या सदस्यांशी चर्चा करून कोल्हापूर वस्तुसंग्रहालयाचे सहायक अधिरक्षक अमृत पाटील यांनी पुरातत्त्व खात्याच्यावतीने हे काम करण्यात यावे, असा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे.
पर्याय खुल्या निविदेचा...
प्राचीन वास्तूंच्या विकासाचे काम वेगळ्या पद्धतीने आणि त्यांचे प्राचीनत्व जपत करावे लागते, त्यामुळे अशा वास्तूंच्या कामाचा अनुभव असलेल्या ठेकेदारांनाच हे काम दिले जाते किंबहुना तशी अटच असते. अशा प्राचीन वास्तूंचे काम करणारे अनेक ठेकेदार असले तरी शाहू जन्मस्थळसाठी कोणी तयारी दर्शवलेली नाही. अमृत पाटील यांनी यापूर्वी कोल्हापूर वस्तुसंग्रहालयाचे काम केले आहे. त्यामुळे हे कामही खात्याच्यावतीने करण्याचा विचार करण्यात आला आहे, तर दुसरीकडे खुल्या निविदा प्रक्रियेमुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने वास्तूचे प्राचीनत्व खुलवता येत असेल तर त्याचाही विचार व्हावा, असे तज्ज्ञांचे मत आहे.
शाहू जनमस्थळाच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी तीनवेळा निविदा प्रसिद्ध करूनही अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही, शिवाय हे काम ठेकेदाराला दिले तरी त्यावर पुरातत्त्व खात्यालाच मॉनिटरिंगचे काम करावे लागणार आहे. त्यामुळे टाऊन हॉलप्रमाणे खात्याकडूनच हे काम केले जावे, असा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यास मंजुरी मिळाली की तातडीने कामाला सुरुवात होईल.
- अमृत पाटील (सहा. अभिरक्षक कोल्हापूर वस्तुसंग्रहालय)