ठेकेदार, बांधकाम विभागाचा वेळकाढूपणा

By admin | Published: April 21, 2015 12:03 AM2015-04-21T00:03:29+5:302015-04-23T01:04:16+5:30

तमदलगे-अंकली चौपदरीकरण रस्ता : रस्त्यामुळे नागरिकांना सोसाव्या लागताहेत मरणयातना; लोकप्रतिनिधी लक्ष देणार का?

Contractor, time-management of construction department | ठेकेदार, बांधकाम विभागाचा वेळकाढूपणा

ठेकेदार, बांधकाम विभागाचा वेळकाढूपणा

Next

जयसिंगपूर : सांगली-कोल्हापूर चौपदरीकरणांतर्गत तमदलगे बसवान खिंड ते अंकली टोलनाका दरम्यानच्या रस्ताप्रश्नी ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर या भागातील नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. घरांचे पुनर्वसन, शेतकऱ्यांची नुकसान भरपाई, रस्त्याचे अर्धवट काम, निमशिरगावच्या पर्यायी शाळेचे नियोजन याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार कंपनी कुचकामी असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. केवळ वेळकाढूपणा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. गेली तीन वर्षे या रस्त्यावरून नागरिकांना मरणयातना सोसाव्या लागत आहेत. लोकप्रतिनिधींनाया प्रश्नाचे कसलेही सोयरसुतक नाही, अशा भावनाही व्यक्त करण्यात आल्या.
दरम्यान, निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील कुमार व कन्या विद्यामंदिर या दोन्ही शाळांच्या इमारती चौपदरीकरणांतर्गत जात असल्याने गेल्या दोन वर्षांपासून पर्यायी बांधकामाचा निर्णय झालेला नाही. ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने वेळोवेळी निवेदने देऊनही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. शाळेची इमारत मोडकळीस आली असून, ती कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहे. सुमारे चारशे विद्यार्थ्यांना धोकादायक बनलेल्या इमारतीचे पर्यायी जागेत बांधकाम करून देणे गरजेचे आहे. पर्यायी जागा मोजणीबाबतचा प्रस्ताव भूमापन कार्यालयात प्रलंबित आहे. येत्या जूनमध्ये शाळा भरवायची कोठे, हा प्रश्न गंभीर बनला असून, याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा २७ मे २०१५ला ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन समितीच्यावतीने जुन्या सांगली-कोल्हापूर मार्गावर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतीने निवेदनाद्वारे दिला आहे. (प्रतिनिधी)


निमशिरगावमध्ये काम थांबविले
या शेतकऱ्यांच्या जमिनीतील मुरूम रस्त्यासाठी नेण्यात आला, त्या मुरुमाऐवजी माती टाकण्याचे आश्वासन ठेकेदार कंपनीने दिले होते. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना माती मिळालेली नाही. या कारणातून निमशिरगाव ग्रामपंचायतीने गावातील रस्त्याचे काम थांबविले आहे. शेतकऱ्यांची नुकसानभरपाई, शाळा इमारतीचे बांधकाम जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत रस्त्याचे काम सुरू करू देणार नाही, अशा आशयाचे निवेदन ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी यांना पाठविले आहे.


सुप्रिम कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याकडे तक्रारी देऊनही या भागातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. केवळ हुकूमशाही पद्धतीने चौपदरीकरण रस्त्याचे काम सुरू आहे. आधी लोकांना पर्यायी जागा द्या, मगच रस्ता करा, अन्यथा आंदोलन करू.
- सुरेश कांबळे, दानोळी जि. प. सदस्य


दुपदरीकरण रस्ता करीत असताना रस्त्याचे नियोजन शून्य झाले आहे. वास्तविक रस्ता तयार करीत असताना रस्त्याची एक बाजू तयार केल्यानंतरच दुसरी बाजू उखडणे गरजेचे होते. मात्र, याठिकाणी संपूर्ण रस्ताच उखडण्यात आल्याने नागरिकांना नाहक त्रासास सामोरे जावे लागत आहे. खासदार, आमदार या प्रश्नाकडे लक्ष देणार का ?
- नीळकंठ राजमाने, जैनापूर ग्रामस्थ


शासनाकडून शेतकरी व ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. रस्त्यात येणारी शेतजमीन, घरे यांना कवडीमोल दराने मोबदला दिला जात आहे. शासनाने भूमी अधिग्रहण कायद्याप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी. लोकप्रतिनिधींना या प्रश्नाचे कसलेच सोयरसुतक नाही. - विक्रम पाटील, जैनापूर ग्रामस्थ

तमदलगे येथे सुमारे ३५ घरांचा प्रश्न न सुटल्यामुळे या लोकांनी जायचे कोठे? हा प्रश्न गंभीर आहे. केवळ सातबारा पत्रकी भूमी अधिग्रहण करून अधिकाऱ्यांनी कागदोपत्री मेळ घातला आहे. पर्यायी जागा दिल्यानंतरच घरे सोडण्यात येतील. याबाबत लवकरच एक शिष्टमंडळ घेऊन पालकमंत्र्यांना भेटणार आहे.
- पिरगोंडा पाटील, सरपंच, तमदलगे


चिपरी-जैनापूर खराब रस्त्याबाबत सुप्रिम कंपनीकडे माहिती घेतली असता, हा रस्ता आमच्याकडे अजून वर्ग होणार असल्याचे सांगण्यात आले. तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे चौकशी केली असता चौपदरीकरणांतर्गत हा रस्ता होणार असल्याचे सांगण्यात आल्यामुळे ग्रामपंचायतीकडून आम्हाला मुरूम टाकण्यात अडचणी होत आहेत. खासदार व आमदार यांच्याकडेही हा प्रश्न मांडला आहे.
- सुदर्शन पाटील, चिपरी, सरपंच

Web Title: Contractor, time-management of construction department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.