साकवाचे १८ कोटी अडकल्याने ठेकेदार अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 12:49 PM2020-03-07T12:49:47+5:302020-03-07T12:53:34+5:30
तीन वर्षांपूर्वी बांधलेल्या साकवचे पैसे अद्याप न मिळाल्याने ठेकेदार चांगलेच अडचणीत सापडले आहेत. साकव बांधकामासाठी मंजूर असणारा निधी परत गेला असून, सुमारे १८ कोटी रुपये अडकून पडल्याने ठेकेदारांवर दारोदारी फिरण्याची वेळ आली आहे.
कोल्हापूर : तीन वर्षांपूर्वी बांधलेल्या साकवचे पैसे अद्याप न मिळाल्याने ठेकेदार चांगलेच अडचणीत सापडले आहेत. साकव बांधकामासाठी मंजूर असणारा निधी परत गेला असून, सुमारे १८ कोटी रुपये अडकून पडल्याने ठेकेदारांवर दारोदारी फिरण्याची वेळ आली आहे.
कॉँग्रेस सरकारच्या काळात २०१२ ला जिल्ह्यातील साकव बांधकामास मंजुरी देण्यात आली. वर्कआॅर्डर दिल्याने ठेकेदारांनी कामही सुरू केले आणि त्यातील काही कामे पूर्ण झाली. तर काहींची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. प्रशासकीय मान्यता, कामाचे ठिकाण, कामाचे लाईन आऊट या गोष्टींची पूर्तता बांधकाम विभागाने करणे अपेक्षित असते.
ही प्रक्रिया सुरू असतानाच राज्यात २०१४ ला सत्तांतर झाले आणि कामे थांबली. प्रशासकीय मान्यतेचे कारण पुढे करत बांधकाम विभागाने पैशाची अडवणूक सुरू केली आहे. मंजूर निधी परत गेल्याने ठेकेदार अडचणीत आले. अनेकांनी बॅँकांकडून कर्ज काढून साकवाचे बांधकाम केले.
कामाचे पैसेही नाही आणि बॅँकेतील कर्जावर व्याजाचा बोजा वाढू लागल्याने ठेकेदार हवालदिल झाले आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात उपोषणही केले. तरीही बांधकाम विभागाला पाझर फुटला नाही. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे अनेकवेळा मागणी केली, मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. राज्यात सत्तांतर झाले, पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.