कोल्हापुरातील रस्त्यांची कामे सुरू न करणारे ठेकेदार ब्लॅकलिस्टला जाणार, तीन दिवसात मागितले खुलासे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 05:44 PM2022-12-05T17:44:03+5:302022-12-05T17:44:35+5:30
ठेकेदार महापालिकेच्या भविष्यकाळातील कामांना मुकण्याची शक्यता
कोल्हापूर : कार्यारंभ आदेश देऊनही रस्त्यांची कामे सुरू न करणाऱ्या ठेकेदारांना महानगरपालिका प्रशासनाने ब्लॅकलिस्ट करण्याचे ठरविले असून, बुधवारनंतर ही कारवाई होण्याची शक्यता आहे. कामे घेऊनही ती अद्याप सुरू न केलेल्या ३९ ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस तर एका ठेकेदारावर चोवीस हजार रुपये दंडाची कारवाई प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी शुक्रवारी केली आहे. त्यांच्याकडे तीन दिवसात खुलासे मागितले आहेत.
कार्यारंभ आदेश घेऊनही महानगरपालिका प्रशासनाला वेठीस धरणाऱ्या ठेकेदारांविरुद्ध प्रशासक बलकवडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तीन दिवसात खुलासे देण्यास ठेकेदारांना बजावण्यात आले आहे. त्याची मुदत उद्या (मंगळवारी) संपत आहे. त्यानंतर प्रत्यक्ष खुलासे पाहून कारवाई केली जाणार आहे. प्रशासकांनीच कडक भूमिका घेतल्यामुळे शहर अभियंता व चार उपशहर अभियंतादेखील कोणालाही पाठीशी घालण्याच्या मन:स्थितीत नाहीत. आता लाड पुष्कळ झाले, तातडीने कामाला सुरुवात करा, अशी भूमिका त्यांनीही घेतली आहे.
खुलासा आल्यानंतर ज्या ठेकेदारांनी कामे सुरू करण्यात हलगर्जीपणा केला आहे, त्यांच्यावर दंडात्मक तसेच ब्लॅकलिस्ट करण्याची कारवाई करण्याचे प्रशासनाने ठरविले आहे. त्यामुळे काही ठेकेदार महापालिकेच्या भविष्यकाळातील कामांना मुकण्याची शक्यता आहे. प्रशासक बलकवडे या काही अधिकाऱ्यांवरदेखील कारवाई करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
यापुढे कामे घेणाऱ्या ठेकेदारांनी कार्यारंभ आदेश झाले की, सात दिवसांच्या आत काेणत्याही परिस्थितीत काम सुरूच केले पाहिजे. त्यांची कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही. जे मुदतीत आणि ठरवून दिलेल्या वेळेत काम करणार नाहीत, त्यांना प्रत्येक दिवसाला दंड करण्याच्या तयारीत प्रशासन आहे. अत्यावश्यक बाब म्हणून काही कामे आगाऊ केली जात होती व नंतर ठेकेदारांची बिले दिली जात होती. पण यापुढे आगाऊ कामे करून घेण्याचेही बंद करण्याचा विचार केला जात आहे.
पाऊस लांबल्याचे कारण...
बहुतेक ठेकेदार पाऊस लांबल्याचे कारण देण्याची शक्यता आहे. परंतु, पावसाळा संपून आता सव्वा महिना होत आला, अजून कामांना सुरुवात झालेली नाही. पावसाळ्यात केली जाणारी काॅंक्रीट पॅसेजची कामे होणे अपेक्षित होते. परंतु, ही कामेदेखील ठेकेदारांनी सुरू केलेली नाहीत.
रविवारी दोन कामे सुरू झाली आहेत. ज्या ठेकेदारांनी अद्याप कामे सुरू केली नाहीत, त्यांच्यावर कारवाई अटळ आहे. - नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता