कोल्हापुरात कंत्राटी एसटी चालकांचे भीक मांगो आंदोलन, १६ जिल्ह्यांतील कामगारांचा सहभाग
By संदीप आडनाईक | Published: November 10, 2023 05:12 PM2023-11-10T17:12:06+5:302023-11-10T17:19:43+5:30
उपोषणाचा चौथा दिवस, अन्नपाण्याविना एकाची प्रकृती गंभीर
कोल्हापूर : एसटी संप काळात तसेच कोरोना काळात कंत्राटी कामगार म्हणून एसटी महामंडळात सेवा केलेल्या आणि सध्या सेवेतून कमी केलेल्या कंत्राटी कामगारांना एसटी महामंडळाच्या सेवेत घ्यावे, या मागणीसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी चौथ्या दिवशीही उपोषण केले. पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी या आंदोलनाची दखल घेतली नसल्याने शुक्रवारी त्यांनी भीक मांगो आंदोलन केले.
कोल्हापूरसह राज्यातील १६ जिल्ह्यांतील सुमारे २५० हून अधिक कंत्राटी कामगार या आंदोलनात सहभागी झाले आहेत. राज्य शासन आणि लोकप्रतिनिधींकडून या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने या कामगारांनी भीक मांगो आंदोलन केले. दरम्यान, मंगळवारपासून बेमुदत उपोषणास बसलेले महे ता. करवीर येथील कंत्राटी कामगार गिरीश हुजरे-पाटील यांची अन्नपाण्याविना प्रकृती बिघडल्यामुळे ते मांडवातच झोपून आहेत.
एसटी महामंडळाचे राज्य शासनाच्या सेवेत विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी गेल्या वर्षी एसटी कर्मचाऱ्यांनी संप केला होता. याकाळात एसटी सेवा सहा महिने ठप्प होती. त्याकाळात महामंडळाने कंत्राटी तत्त्वावर चालक वाहकांची नियुक्ती केली. सहा महिन्यांनंतर संप मिटल्यानंतर या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले. त्यांना सरकारने कायमस्वरुपी सेवेत घेण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ती बोलाचीच कढी ठरली. दरम्यान शासनाने विविध रिक्त पदांवर पुन्हा भरती प्रक्रिया सुरु केली, पण या कर्मचाऱ्यांना सामाउन घेतले नाही. संपकाळात कंत्राटींनी दिलेली सेवा विचारात घेऊन कंत्राटींना पुन्हा कामावर घ्यावे, नोकरीत कायम करू नका पण सेवेत वेतन व अन्य पूरक लाभ मिळाल्यास जगण्याला हातभार लागेल, अशी अपेक्षा हे कंत्राटी कामगार करीत आहेत.
शासनाची उदासीनता पाहून विविध प्रकारच्या लोकशाही मार्गाने न्याय्य हक्काचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला, तोंडी आणि लेखी निवेदनेही दिली. त्यानंतर मुंबईत आझाद मैदानात बेमुदत उपोषण केले. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात २८ डिसेंबर रोजी आक्रोश मोर्चानंतर सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन देउन सरकारने वेळ मारुन नेली. आता सहनशीलता संपल्याने कोल्हापुरात या कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केले. ॲड. संतोष मळवीकर, मंगेश वडर, प्रवीण टपरे, विजय गुरव, विजय भोयर, त्रिगुण पवार, विकास जाधव, प्रकाश शिंदे आदी उपोषणात सहभागी झाले आहेत.