थेट अनुदान जमा करण्यास विरोध
By admin | Published: July 16, 2016 12:19 AM2016-07-16T00:19:10+5:302016-07-16T00:22:30+5:30
वैयक्तिक लाभाच्या योजना : स्थायी समिती सभेत दुसऱ्यांदा विषय बारगळला
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण, महिला व बालकल्याणसह विविध विभागांच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी थेट अनुदान जमा करावे, या विषयाला शुक्रवारी उपाध्यक्ष तथा कृषी समिती सभापती शशिकांत खोत व समाजकल्याण सभापती किरण कांबळे यांनी विरोध केला. त्यामुळे हा विषय स्थायी समितीच्या सभागृहात दुसऱ्यांदा बारगळला.
जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू छत्रपती सभागृहात स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी अध्यक्षा विमल पाटील होत्या. प्रमुख उपस्थिती उपाध्यक्ष शशिकांत खोत, शिक्षण समिती सभापती अभिजित तायशेटे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ज्योती पाटील, बांधकाम समितीच्या सभापती सीमा पाटील, समाजकल्याण समिती सभापती किरण कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, आदींची होती.
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण, महिला व बालकल्याणसह विविध विभागांच्या माध्यमातून वैयक्तिक लाभांच्या योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना साहित्य दिले जाते. यामध्ये शिलाई यंत्र, दुधाच्या किटल्या, पिठाची चिक्की, पिको फॉल यंत्र, ताडपत्री, खुरपे, आदी साहित्याचा
समावेश आहे. हे साहित्य खरेदी करून ते संबंधित लाभार्थ्याला द्यावे व ते खरेदी करण्यासाठी थेट अनुदानाची रक्कम संबंधित लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करावी, असे मतप्रवाह जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांमध्ये आहे. याच विषयावर शुक्रवारच्या स्थायी समितीच्या सभेत विशेष चर्चा झाली.
वैयक्तिक लाभाचे अनुदान लाभार्थ्याच्या खात्यावर थेट जमा करावे, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. त्याला उपाध्यक्ष शशिकांत खोत व समाजकल्याण सभापती किरण कांबळे यांनी थेट विरोध केला. यामुळे हा विषय येथेच थांबला.
यापूर्वीच्या स्थायी समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेचे
सदस्य धैर्यशील माने यांनी थेट अनुदान जमा करावे, अशी मागणी केली होती. त्यावेळीही तिला विरोध झाला होता. याच प्रश्नावर शुक्रवारी चर्चा झाली; परंतु यावेळी म्हणजे सलग दुसऱ्या वेळीही याला विरोध झाल्याने हा विषय बारगळला. (प्रतिनिधी)