१७०० रुपये उचलीला विरोध
By admin | Published: December 15, 2015 12:11 AM2015-12-15T00:11:29+5:302015-12-15T00:27:13+5:30
‘स्वाभिमानी’ आक्रमक : ‘दत्त’, ‘जवाहर’च्या शेती कार्यालयांना टाळे; कुरुंदवाडमध्ये खुर्च्यांची तोडफोड
जयसिंगपूर / कुरुंदवाड : साखर कारखान्यांकडून उसाची पहिली उचल १७०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत असल्याची कुणकुण लागताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जयसिंगपूर व कुरुंदवाड येथील कारखान्यांच्या शेती कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले. कुरुंदवाडमध्ये जवाहर कारखान्याच्या कार्यालयात ‘स्वाभिमानी’च्या संतप्त कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची मोडतोड केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. दरम्यान, आज, मंगळवारी दुपारी बारा वाजेपर्यंत फॉर्मुल्याप्रमाणे कारखानदारांनी दर जाहीर करावा, अन्यथा उद्या, बुधवारपासून ऊस वाहतूक रोखण्याचा इशारा यावेळी ‘स्वाभिमानी’ने दिला. ‘एफआरपी’च्या रकमेवरून आंदोलनाची पहिली ठिणगी पडली असून साखर कारखानदार कोणता निर्णय घेतात याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.एफआरपीबाबत मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत ८० :२० टक्केचा फॉर्म्युला स्वाभिमानी संघटनेने मान्य केला आहे. ८० टक्क्यांप्रमाणे येथील कारखान्यांची पहिली उचल २००२ रुपये होते. मात्र, जवाहर व दत्त साखर कारखान्यांकडून पहिली उचल १७०० रुपये सेवा सोसायटीची छाननी करून जमा करण्याच्या हालचाली सुरू केल्याची कुणकुण स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना सोमवारी दुपारी चारच्या सुमारास लागली. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी जयसिंगपूर येथील जवाहर कारखान्याच्या शेती विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बाहेर काढून कार्यालयास टाळे ठोकले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी शरद कारखान्याच्या विभागीय कार्यालयाकडे फॉर्म्युल्याप्रमाणे दर देण्याची मागणी केली. १३ व्या गल्लीतील दत्त कारखान्याच्या विभागीय कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले. उदगाव येथे ऊस वाहतूक करणारी वाहने काही काळ अडवून आंदोलन केले. आंदोलनात अण्णासो चौगुले, जि. प.चे सदस्य सावकर मादनाईक, अदिनाथ हेमगिरे, सागर शंभूशेट्टे, सागर चिप्परगे, विठ्ठल मोरे, मिलिंद साखरपे, मारुती चौगुले, राजगोंडा पाटील, रामगोंडा पाटील, सागर मादनाईक, दिग्विजय सूर्यवंशी, अशोक आनंदा यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले.कुरुंदवाड येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी @‘जवाहर’च्या विभागीय कार्यालयातील प्लास्टिक खुर्ची बाहेर आणून मोडतोड केली. कार्यालयाला टाळे ठोकून मोर्चा दत्त साखर कारखाना कार्यालयाकडे वळला. येथील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढत असताना कुरुंदवाड पोलीस येथे दाखल झाले. त्यांनी आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन केले. बंडू पाटील, विश्वास बालीघाटे, बाळासो मगदूम, अबू महात, सुरेश भबिरे, दत्ता गुरव, नंदू पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
‘स्वाभिमानी’चा सहसंचालक कार्यालयात ठिय्या
कोल्हापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी प्रतिटन १७०० रुपयेप्रमाणे पहिली उचल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात सोमवारी गोंधळ घातला. यावेळी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करत तब्बल दोन तास कार्यालयात ठिय्या मारला. ‘शाहू’, ‘मंडलिक’ व ‘घोरपडे’ या कागल तालुक्यातील कारखान्यांवर कारवाईचे लेखी पत्र घेतल्यानंतरच कार्यकर्त्यांनी कार्यालय सोडले.
राज्य सरकार व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यामध्ये झालेल्या समझोत्यानुसार ८० टक्के पहिली उचल देणे बंधनकारक होते. परंतु, दत्त-शिरोळ, जवाहर-हुपरी या कारखान्यांनी १७०० रुपयांप्रमाणे बिले देण्याची तयारी सुरू केली आहे. हे समजताच ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सायंकाळी पाच वाजता प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय गाठले. यावेळी या कारखान्यांनी १७०० रुपये उचल कशी दिली? असा जाब विचारत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यानंतर साखर उपसंचालक दिग्विजय राठोड यांनी ‘दत्त’ व ‘जवाहर’ कारखाना प्रशासनाशी बोलणे केले. यावर, विकास संस्थांच्या कर्जासाठी ही छाननी सुरू केली आहे. हा ऊस दर नसल्याचे कारखाना प्रशासनाने खुलासा केला. परंतु, ‘स्वाभिमानी’शी झालेल्या समझोत्यानुसार ८० टक्के उचल होते का? अशी विचारणा करत ही छाननी थांबविण्याची मागणी जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी केली.
तसेच, शाहू-कागल, मंडलिक-हमीदवाडा, संताजी घोरपडे-सेनापती कापशी या कारखान्यांनी १७०० रुपये प्रमाणे बॅँकेत पैसे जमा केल्याचे स्वस्तिक पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. त्यांनी दिलेली उचल परत घेण्याचे आदेश द्यावेत; अन्यथा कार्यालय सोडणार नाही, यावर कार्यकर्ते ठाम राहिले. त्यामुळे कारवाईचे लेखी पत्र दिल्यानंतरच कार्यकर्त्यांनी कार्यालय सोडले. यावेळी लेखापरीक्षक धनंजय पाटील, प्रकाश परीट, महेश पाटील, सचिन शिंदे, अजित दानोळे, प्रीतम पाटील, आशिष समगे, शहाजी गावडे, अमोल पाटील आदी उपस्थित होते.