संशोधनातून देशाच्या प्रगतीला हातभार लावा

By Admin | Published: December 31, 2016 01:22 AM2016-12-31T01:22:16+5:302016-12-31T01:22:16+5:30

माणिकराव साळुंखे : अनुराधा पौडवाल ‘डी. लिट.’, वेदप्रकाश मिश्रा ‘डी. एस्सी.’ने सन्मानित; डी. वाय. पाटील विद्यापीठाचा पाचवा दीक्षान्त समारंभ उत्साहात

Contribute to the country's progress through research | संशोधनातून देशाच्या प्रगतीला हातभार लावा

संशोधनातून देशाच्या प्रगतीला हातभार लावा

googlenewsNext

कोल्हापूर : भारतीय आरोग्य संवर्धनाचे भवितव्य वैद्यकीय क्षेत्रातील पदवीधर युवक-युवतींच्या हातात आहे. त्यांची बौद्धिक क्षमता देशाच्या वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन उंचाविण्यास उपयुक्त ठरेल. या पदवीधरांनी उच्च शिक्षण व संशोधनात काम करून देशाच्या प्रगतीला हातभार लावावा, असे प्रतिपादन इंदूरच्या सिम्बॉयोसिस अ‍ॅप्लाईड सायन्सेस विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी शुक्रवारी येथे केले.
डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या पाचव्या दीक्षान्त समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सयाजी हॉटेलमधील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय भटकर, तर कुलगुरू डॉ. पी. बी. बेहेरे, शांतादेवी डी. पाटील, डी. वाय. पाटील विद्यापीठ ट्रस्टचे अध्यक्ष संजय डी. पाटील, आमदार सतेज पाटील प्रमुख उपस्थित होते. यावेळी कुलपती डॉ. भटकर यांच्या हस्ते गायिका अनुराधा पौडवाल यांना सन्मानदर्शक ‘डॉक्टर आॅफ लेटर्स’ (डी. लिट.), तर कऱ्हाडच्या कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांना सन्मानदर्शक ‘डॉक्टर आॅफ सायन्स’ (डी. एस्सी.) पदवीने गौरविण्यात आले. शानदार, उत्साही वातावरणातील या समारंभात २१६ स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली.
कुलगुरू डॉ. साळुंखे म्हणाले, देशाचा आर्थिक विकास विविध सूक्ष्म घटकांवर अवलंबून असतो. यात कुशल मनुष्यबळ असणे महत्त्वाचे आहे. हे मनुष्यबळ उच्च शिक्षणातून साध्य करता येते. त्या दृष्टीने विद्यापीठांनी कार्यरत राहणे महत्त्वाचे आहे. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे आगामी काळात संशोधन व गुणवत्तापूर्ण शिक्षणात मोठे योगदान असेल. कुलपती डॉ. भटकर म्हणाले, सध्या ज्ञान ही सर्वांत शक्तिशाली ताकद आहे. त्याच्या जोरावर बदल, पुनर्रचना करता येते. त्यामुळे विविध स्वरूपांतील ज्ञान युवापिढीने आत्मसात करणे आवश्यक आहे. उच्च शिक्षण व संशोधनातील वाटचाल पाहता, भविष्यात भारत ‘विश्वगुरू’ म्हणून पुढे येईल. वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनात डी. वाय. पाटील विद्यापीठ अग्रेसर आहे.
या दीक्षान्त समारंभाच्या प्रारंभी परीक्षा नियंत्रक डॉ. ए. सी. पवार हे ‘ज्ञानदंड’ घेऊन प्रमुख पाहुणे, अधिष्ठातांसह दीक्षान्त मंडपात आले. विद्यापीठाच्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, डॉ. एस. एच. पवार, पी. बी. साबळे, जे. एफ. पाटील, एन. जी. ताकवले, बी. एम. हिर्डेकर, रवी शिराळकर, वैजयंती पाटील, प्रतिमा पाटील, राजश्री काकडे, मेघराज काकडे, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, करण काकडे, आदी उपस्थित होते. कुलगुरू डॉ. पी. बी. बेहेरे यांनी विद्यापीठाच्या कामगिरीचा आढावा घेतला. ट्रस्टचे अध्यक्ष संजय डी. पाटील यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेतला. रचना पावसकर व चैतन्या पाटील यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)


डी. वाय. पाटील विद्यापीठ व्यक्ती घडविते
शिक्षणातून माणूस स्वाभिमानी बनतो; शिवाय शिक्षणातून प्राप्त ज्ञानाचा त्याच्या स्वत:ला आणि देशाला उपयोग होतो, असे प्रतिपादन कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले. ते म्हणाले, समाजातील सर्व घटकांना शिक्षण मिळावे. गरिबातील गरीब आणि मागासातील मागास व्यक्तीपर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे, यासाठी डी. वाय. पाटील विद्यापीठ काम करते. हे विद्यापीठ व्यक्ती घडविते. या विद्यापीठाने डी. एस्सी पदवीद्वारे केलेला सन्मान माझ्यासाठी मोठा आहे. हा सन्मान मी माझ्या आईला समर्पित करतो.
‘फाईव्ह स्टार’ दीक्षान्त समारंभ
या विद्यापीठातर्फे यावर्षी पहिल्यांदाच पंचतारांकित सयाजी हॉटेलमध्ये दीक्षान्त समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभात प्रमुख उपस्थितांच्या हस्ते विविध अभ्यासक्रमांतील दिग्विजय चव्हाण, विक्रम शर्मा, ग्लोरिया गायकवाड, कॅरोलिना रॉड्रिक्स, वीर ठाकूर, चमनदीप कांबोज, एस. जोसेफर यांना सुवर्णपदकाने गौरविण्यात आले.
जीवनात सकारात्मकता ठेवा : पौडवाल
इच्छित ध्येय गाठायचे असल्यास त्यासाठी पहिल्यांदा मार्ग निश्चित करा. जीवनात सकारात्मकता ठेवा, असा सल्ला गायिका अनुराधा पौडवाल यांनी यावेळी दिला. त्या म्हणाल्या, आयुष्यात विविध संकटांवर मात करीत यशापर्यंत मी पोहोचले आहे. डी. वाय. पाटील विद्यापीठाने डी. लिट. देऊन केलेला हा सन्मान मी माझ्या वडिलांना समर्पित करते. दरम्यान, पदवी स्वीकारल्यानंतर गायिका पौडवाल यांनी थोडक्यात आपला जीवनप्रवास उलगडला. यातील काही आठवणी सांगताना त्यांना गहिवरून आले.

कुलगुरू डॉ. साळुंखे म्हणाले...
यशाचा आनंद घेण्यासाठी जीवनात अडचणी येणे आवश्यक आहे.
वेगळा विचार करायला, वेगळे शोधायला, वेगळा मार्ग चोखाळायला धैर्य लागते. तेच तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाते.
खासगी क्षेत्रातील दर्जेदार उच्च शिक्षणामध्ये डी. वाय. पाटील विद्यापीठाने नाव कमावले आहे.

Web Title: Contribute to the country's progress through research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.