सदस्य, शिक्षक संघटनांपुढे प्रशासनाचे नमत
By admin | Published: January 7, 2015 12:50 AM2015-01-07T00:50:53+5:302015-01-07T00:55:34+5:30
शालेय क्रीडा स्पर्धा : १९ जानेवारीला प्रारंभ; खोडा घालण्याच्या प्रवृत्तीला लगामे
कोल्हापूर : महापालिका प्राथमिक शिक्षक मंडळातर्फे गेली ५४ वर्षे घेण्यात येणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धेला प्रशासनाने घातलेला खोडा आज, मंगळवारी दूर झाला. शिक्षक संघटना, मंडळाचे सदस्य व प्रशासन अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत सोमवार, १९ जानेवारीला क्रीडा स्पर्धा घेण्याचे ठरले. १५ हजारांच्या निधीचे कारण पुढे करीत स्पर्धा घेण्याचे टाळणाऱ्या अधिकाऱ्यांना सदस्यांनी फैलावर घेतले.
प्राथमिक मंडळाकडे पूर्णवेळ प्रशासन अधिकारी नाही. सध्या राजाराम हायस्कूलचे मुख्याध्यापक बी. एम. किल्लेदार यांच्याकडे प्रभारी पदभार आहे. शाळेच्या कामकाजातून त्यांना वेळ देता येत नाही. महापालिकेच्या राजकारणामुळे प्रशासन अधिकारीपदी कोणी कार्यकाल पूर्ण करीत नाहीत. क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाचा त्रास कोणी सोसायचा, यापेक्षा स्पर्धाच रद्द करण्याचा घाट अधिकाऱ्यांनी घातला.
महापालिका शिक्षण मंडळ दरवर्षी शहरातील महापालिका प्रशाला व इतर खासगी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे क्रीडा महोत्सवाचे आयोजन करते. गेली ५४ वर्षे अखंडपणे या क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. मात्र, यंदाच्या वर्षी निधी नाही; यामुळे या स्पर्धा रद्द करण्यात आल्याचे प्रशासनाने जाहीर केले.
याबाबत शिक्षण मंडळ सभापती संजय मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक महासंघ व खासगी प्राथमिक शिक्षक समिती व महासंघ यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये १९ जानेवारीपासून गांधी मैदान येथे या स्पर्धांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मंडळाचे सदस्य अशोक पोवार यांनी ‘लोकमत’ला दिली. (प्रतिनिधी)