महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासात सहकाराचा मोलाचा वाटा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2017 07:14 PM2017-11-25T19:14:11+5:302017-11-25T19:14:15+5:30
महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक, औद्योगिक, सांस्कृतिक परिवर्तनात सहकाराचा मोठा मोलाचा वाटा आहे. शेतकऱ्यांच्या जीवनातील आर्थिक परिवर्तन हे सहकारामुळेच आहे.
कोल्हापूर : महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक, औद्योगिक, सांस्कृतिक परिवर्तनात सहकाराचा मोठा मोलाचा वाटा आहे. शेतकऱ्यांच्या जीवनातील आर्थिक परिवर्तन हे सहकारामुळेच आहे. हा सन्मार्ग छत्रपती राजर्षि शाहू महाराजांनी दाखवून दिलेला आहे. महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन कार्य करीत आहे. त्यांची प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात सर्वांगिण परिवर्तन करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
8 जुलै 1917 रोजी स्थापन झालेल्या दी कागल को- ऑपरेटिव्ह बँक, लि. कागल या बँकेच्या शतकमहोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑपरेटिव्ह बँक, लि. कागल असे नामकरण कागल येथे आयोजित नामकरण सोहळ्यात करण्यात आले.
यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार सुरेश हळवणकर, आमदार अमल महाडिक, प्रविणसिंह घाटगे, सुहासिनीदेवी घाटगे, नवोदिता घाटगे, यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष हिंदूराव शेळके, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, गोकुळचे संचालक बाबा देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
कर्जमाफीचे काम येत्या 10 ते 15 दिवसात पूर्ण होईल - मुख्यमंत्री
राज्यातील शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेली कर्जमाफी आधारच्या माध्यमातून करुन पारदर्शी कर्जमाफी करण्यावर भर दिला. महाराष्ट्रातील 15 लाख 42 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे 6 हजार 500 कोटी रुपये आजच भरले असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यापुढे 10 लाख शेतकऱ्यांची यादी पुन्हा 10 लाख शेतकऱ्यांची यादी अशा पद्धतीनं कर्जमाफीचे काम येत्या 10 ते 15 दिवसात पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे इंजिनिअरिंग कॉलेजच्या पटांगणावर श्री वारणा सहकारी विविध उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने आयोजित केलेल्या दिलखुलास मुक्त संवाद कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. समारंभास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच वारणा उद्योग व शिक्षण समुहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे हेही उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुक्त संवाद कार्यक्रमाद्वारे शेतकरी,ऊस उत्पादक, दूध उत्पादक, लोक प्रतिनिधी,सहकारी संस्थाचे पदाधिकारी, महिला बचत गट, कामगार, शिक्षक तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.