एड्स नियंत्रणासाठी खासगी संस्थांचे योगदान मोलाचे! : ए. डी. माळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:24 AM2021-01-08T05:24:10+5:302021-01-08T05:24:10+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील नवीन गरोदर माता एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण कमालीचे घटले असून, शासकीय एड्स नियंत्रण कर्मचाऱ्यांबरोबर खासगी संस्थांचा हातभार ...
कोल्हापूर : जिल्ह्यातील नवीन गरोदर माता एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण कमालीचे घटले असून, शासकीय एड्स नियंत्रण कर्मचाऱ्यांबरोबर खासगी संस्थांचा हातभार मोलाचा ठरल्याचे गौरवोद्गार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ए. डी माळी यांनी काढले.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था व ''''साथी'''' या संस्थेमार्फत आयोजित कोल्हापूर जिल्ह्यातील गरोदर मातांमधील एचआयव्ही तपासणीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या, पीपीपी तत्त्वावरील खासगी प्रयोगशाळा, दवाखाने यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर व साथी संस्थेच्या वैद्यकीय व्यवस्थापक डॉ. सुरभी प्रिया प्रमुख उपस्थित होत्या.
डॉ. माळी म्हणाले की, एड्स नियंत्रणासाठी शासनाबरोबरच स्वयंसेवी संस्था व खासगी दवाखाने प्रयोगशाळा यांचे एकत्रित प्रयत्न महत्त्वाचे आहेत. एखादी गरोदर माता एचआयव्ही संसर्गित आढळल्यास, वेळेत औषधोपचार झाल्यास तिला होणारे बाळ एचआयव्हीपासून वाचू शकते. यासाठी खासगी आरोग्य संस्थेमध्ये येणाऱ्या मातांची एचआयव्ही तपासणी करून ती आकडेवारी शासनाला दर महिन्याला सादर करण्याचे काम करत आहेत ही अभिमानास्पद बाब आहे.
जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर म्हणाल्या, "जागतिक एकता व सामायिक जबाबदारी" हे या वर्षीच्या जागतिक एड्स दिनाचे ब्रीदवाक्य आहे. याला अनुसरूनच जिल्ह्य़ातील ९० पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) संस्था सामायिक जबाबदारीने गरोदर मातांची एचआयव्ही तपासणी करत असून, त्यांच्या या कामामुळे जिल्ह्यातील गरोदर मातांमधील नवीन एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण कमालीचे घटण्यास मदत होत आहे. ज्या खासगी प्रयोगशाळा, मॅटनिर्टी होम अजूनही पीपीपी म्हणून संलग्नित झालेल्या नाहीत, त्यांनी जिल्हा एड्स विभागास संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
साथी संस्थेच्या वैद्यकीय व्यवस्थापक डॉ. सुरभी प्रिया यांनी संस्थेमार्फत गरोदर मातांसाठी चालवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. एखादी गरोदर माता एचआयव्ही संसर्गित आढळल्यास तिच्यासाठी करावयाचे औषधोपचार व सेवा, सुविधा यांचीही माहिती त्यांनी दिली.
यावेळी पीपीपी म्हणून कार्यरत असलेल्या संस्थांचा तसेच जिल्ह्यातील एड्स नियंत्रण कार्यक्रमातील कर्मचारी, अधिकारी यांचा सत्कार स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक साथीचे प्रवीण पारसे यांनी केले. यावेळी जिल्हा पर्यवेक्षक निरंजन देशपांडे, एड्स नियंत्रण कर्मचारी व खासगी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
फोटो : ०७०१२०२१ कोल एड्स कंट्रोल
फोटो ओळी : कोल्हापुरात महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था व ''''साथी'''' या संस्थेमार्फत आयोजित कोल्हापूर जिल्ह्यातील गरोदर मातांमधील एचआयव्ही तपासणीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थांचा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ए. डी माळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी निरंजन देशपांडे, दीपा शिपूरकर, डॉ. सुरभी प्रिया, आदी उपस्थित होते.