लसजागृती अभियानात कोल्हापूरच्या वैज्ञानिकाचा हातभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:23 AM2021-04-16T04:23:34+5:302021-04-16T04:23:34+5:30
कोल्हापूर : भारतीय राष्ट्रीय युवा विज्ञान अकादमी (आयएनवायएएस) या संस्थेने सुरू केलेल्या कोविड १९ लसीकरणाच्या जनजागृतीसाठी राबविण्यात ...
कोल्हापूर : भारतीय राष्ट्रीय युवा विज्ञान अकादमी (आयएनवायएएस) या संस्थेने सुरू केलेल्या कोविड १९ लसीकरणाच्या जनजागृतीसाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेत कोल्हापूरच्या वैज्ञानिकाचा हातभार आहे. संस्थेने एक मोबाइल ॲप विकसित केले असून यात लसीकरणासंदर्भात अकरा भाषांत माहिती देण्यात आली आहे. यातील मराठी भाषेतील माहितीचे भाषांतर जयवंत गुंजकर या कोल्हापूरच्या वैज्ञानिकाने केले आहे.
भारतीय राष्ट्रीय युवा विज्ञान अकादमी (आयएनवायएएस) ही भारतीय वैज्ञानिकांची शिखर संस्था आहे. विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या या संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे. या संस्थेमार्फत कोविड १९ लस जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे.
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत देशभर या मोहिमेचा प्रारंभ ६ एप्रिल २०२१ रोजी करण्यात आला. कोविड लसीकरणासंदर्भातील समज आणि गैरसमज स्पष्ट करणारी माहिती या मोहिमेंतर्गत देण्यात येत आहे. ही माहिती इंग्रजी, हिंदी आणि मराठीसह देशभरातील अकरा भाषांमध्ये आहे. भारतीय राष्ट्रीय युवा विज्ञान अकादमीने ही लस जागृती मोहीम आयोजित केली असून यासाठी एक मोबाइल ॲप विकसित करण्यात आले आहे.
लसीकरणासंदर्भात ३० प्रश्नांची सूची तयार करण्यात आली असून लसीविषयी असणारे समज आणि गैरसमजासंदर्भात माहिती या ॲपवर उपलब्ध आहे. मराठी भाषेतील माहिती अकादमीचे वैज्ञानिक कोल्हापूरचे जयवंत गुंजकर आणि विवेक पारकर यांनी भाषांतरित केले आहे. जयवंत गुंजकर हे कोल्हापुरातील वैज्ञानिक असून डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ते सध्या कार्यरत आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी यासंदर्भातील माहिती ट्विटरद्वारे देउन या मोहिमेला शुभेच्छा दिल्या आहेत.
परिणामकारक ग्राफिक्सचा वापर
लस आल्यानंतरही सामान्य माणसांमध्ये यासंदर्भात साशंकता आहे. त्यामुळे लस सुरक्षित आहे, कोरोना विषाणू आणि कोविड १९, लसींविषयीचे कार्य, मान्यता आणि उत्पादन, लसीकरणाची कार्यपद्धती, संरक्षण आणि दुष्परिणाम, आरोग्य, नैतिक आणि धार्मिक समस्या, लसीकरण आणि भविष्यातील लसी अशा विभागातील माहिती या ॲपवर दिलेली आहे. यामुळे या लसीविषयीची चिंता, साशंकता दूर करणारी आश्वासक आणि अधिकृत माहिती तीस प्रश्न आणि उत्तरे या स्वरूपात एकत्रितरीत्या मांडण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे. ही माहिती अधिक विश्वासार्ह आणि वाचनीय होण्यासाठी परिणामकारक ग्राफिक्सचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये व्हिडिओ आणि ऑडिओच्या माध्यमातून प्रेरणादायी माहिती प्रसारित करण्यात आली आहे.