‘दौलत’चा ताबा २५ कोटी भरल्यावरच

By admin | Published: January 8, 2016 12:43 AM2016-01-08T00:43:09+5:302016-01-08T01:25:31+5:30

‘कुमुदा’ला तत्त्वत: मंजुरी : जिल्हा बँकेने दिली पैसे देण्यासाठी ३१ जानेवारीची मुदत

The control of 'Daulat' is only 25 crores | ‘दौलत’चा ताबा २५ कोटी भरल्यावरच

‘दौलत’चा ताबा २५ कोटी भरल्यावरच

Next

कोल्हापूर : गेली चार हंगाम बंद असलेला चंदगड तालुक्यातील दौलत सहकारी साखर कारखाना बेळगावच्या ‘कुमुदा शुगर्स’ कारखान्यास २९ वर्षे भाड्याने चालविण्यास देण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. कुमुदा शुगर्सने ३१ जानेवारीपूर्वी दहा कोटी रुपये रोख व १५ कोटींची थकहमी दिल्यानंतर कारखान्याचा ताबा देण्यात येईल, असे तत्त्वत: सहमतीचे पत्र बँकेच्यावतीने गुरुवारी अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी ‘कुमुदा’चे अध्यक्ष अविनाश भोसले यांना दिले.
सहमती पत्राचा कालावधी ३१ जानेवारी २०१६ पर्यंत आहे. त्यांनी तत्पूर्वी दहा कोटी रोख व २९ जानेवारीपूर्वी बँकेस रक्कम प्राप्त होणारी राष्ट्रीयीकृत बँकेची थकहमी बँकेच्या नावे न दिल्यास हे मंजुरीचे पत्र रद्द ठरविण्यात येणार आहे.
‘कुमुदा’ने राज्यातील पाच कारखान्यांच्या शेतकऱ्यांचे हजारो कोटी रुपये बुडविले आहेत, तरीही तुम्ही त्यांनाच हा कारखाना का देता, अशी विचारणा करून या प्रक्रियेच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे कारखान्याचे माजी अध्यक्ष व माजी आमदार नरसिंग गुरुनाथ पाटील यांनी करारास लेखी विरोध दर्शविला.
पाटील यांच्या विरोधाची बँकेने दखल घेतली असून, बँकेचा ताळेबंद सुधारायचा असेल तर कारखाना चालवायला देण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आम्ही बँकेच्या हिताचाच विचार करून हा कारखाना ‘कुमुदा’ला चालवायला देण्याचा निर्णय घेतल्याचे अध्यक्ष मुश्रीफ यांनी पत्रकारांना सांगितले.
या कारखान्यावर १७३ कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यापैकी एकट्या जिल्हा बँकेचेच ६३ कोटी रुपये आहेत. हा कारखाना चालवायला न दिल्यास बँकेला फास लागतो यासाठी गेली अनेक दिवस तो विक्री अथवा भाडेतत्त्वावर देण्याचे प्रयत्न सुरू होते; परंतु त्याची रक्कम जास्त असल्याने अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी ‘कुमुदा शुगर्स’ला हा कारखाना दीर्घ मुदतीने भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला.
मुश्रीफ म्हणाले, अविनाश भोसले यांनी याचवर्षी कारखाना सुरू करावा. आता बाजारात साखरेला चांगले दर असल्याने त्यांच्याही ते फायद्याचे ठरेल. २९ वर्षांच्या कालावधीत ते विस्तारीकरण, सहवीज प्रकल्प उभारू शकतील. बँक त्यांना सर्व पातळीवर सहकार्य करेल.’
मी चंदगड तालुक्यातीलच असल्याने हा कारखाना सुरू करण्याची संधी मला मिळत असल्याचा आनंद होत असल्याचे अविनाश भोसले यांनी सांगितले. याचवर्षी चाचणी हंगाम घेणार असल्याचे सांगितले.
यावेळी बँकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण, संचालक प्रा. जयंत पाटील, उदयानी साळुंखे, अनिल पाटील, बाबासाहेब पाटील, अशोक चराटी, असिफ फरास, व्यवस्थापक ए. बी. माने, गोरख
शिंदे, ‘दौलत’चे अध्यक्ष अशोक जाधव, ज्येष्ठ संचालक गोपाळराव पाटील, कार्यकारी संचालक
मनोहर होसूरकर, आदी यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)


मान्यता पत्रातील अटी
करार तारखेपासून २९ वर्षांसाठी भाडेकरार
बँक कर्जाच्या थकबाकी रकमेवरील व्याज नियमानुसार बँकेत जमा करावे लागेल
एनसीडीसी, साखर विकास निधी, कर्मचारी देणी व शासकीय देणी यांच्या देय रकमेबाबत ‘कुमुदा’ने त्यांच्या स्तरावर संबंधितांशी चर्चा करून रक्कम व परतफेड कालावधी निश्चित करावा. निश्चित रक्कम व परतफेड कालावधी याबाबतचा कृती आराखडा करारापूर्वी बँकेकडे सादर करणे आवश्यक
बँकेने ‘कुमुदा’ची निविदा जशी आहे तशी स्वीकारली आहे. त्यामुळे निविदा प्रक्रियेबाबत काही वाद झाल्यास बँक कोणतीही जबाबदारी घेणार नाही.
बँक व्यवस्थापन व कुमुदा यांनी एकत्रितपणे कराराचा मसुदा अंतिम करावयाचा आहे.



कर्मचारी व बचाव समितीचा पाठिंबा
‘दौलत’च्या कर्मचाऱ्यांनी व कारखाना बचाव समितीनेही आपली भेट घेऊन कारखाना सुरू करा, आम्ही सर्व सहकार्य करतो, असे आश्वासन दिले असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.


दौलत कारखान्यावरील कर्जाचे ओझे
जिल्हा बँक : ६४ कोटी ११ लाख
एनसीडीसी : ३९ कोटी ६३ लाख
साखर विकास निधी : १५ कोटी २८ लाख
कामगार देणी : २४ कोटी ३४ लाख
एसएमपी कर्ज : ६ कोटी ४८ लाख
ऊस खरेदी करासह देणी : २२ कोटी ३५ लाख
शासकीय हमी शुल्क : १ कोटी ३९ लाख
एकूण : १७३ कोटी ६१ लाख

प्राधिकृत अधिकारी
‘कुमुदा शुगर्स’शी
यापुढील काळात व्यवहार करण्यासाठी बँकेच्या वतीने चंदगड तालुक्याचे
विभागीय अधिकारी जे. एन. पाटील यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

Web Title: The control of 'Daulat' is only 25 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.