विद्यापीठातील प्रभारी अधिष्ठातापदाच्या वादग्रस्त नेमणुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 05:43 PM2020-08-01T17:43:25+5:302020-08-01T18:01:12+5:30
विद्यापीठातील चार अधिष्ठातांपैकी तीन नेमणुका वादग्रस्त असून त्या रद्द करण्याची मागणी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) केली आहे. त्याबाबतचे पत्र ह्यसुटाह्णने प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना पाठविले आहे.
कोल्हापूर : विद्यापीठातील चार अधिष्ठातांपैकी तीन नेमणुका वादग्रस्त असून त्या रद्द करण्याची मागणी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) केली आहे. त्याबाबतचे पत्र ह्यसुटाह्णने प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना पाठविले आहे.
डॉ. करमळकर यांनी प्रभारी अधिष्ठातांच्या नेमणुका केल्या आहेत. त्यातील डॉ. मेघा गुळवणी या परीक्षा प्रमादामध्ये गुंतलेल्या आहेत. त्यांची अधिष्ठातापदी नेमणूक करणे अनुचित आहे. डॉ. ए. एम. गुरव यांना लागोपाठ अधिष्ठातापदी नेमता कामा नये. त्यामुळे त्यांची अधिष्ठातापदी नेमणूक करणे नियमबाह्य आहे.
प्राचार्य डी. एस. मोरसका यांच्याबाबत ते महाविद्यालयात सतत गैरहजर राहणे, महाविद्यालयाच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामाकडे दुर्लक्ष करणे, आदी तक्रारी आहेत. ते प्रभारी अधिष्ठातापदासाठी पात्र नाहीत. त्यामुळे डॉ. करमळकर यांनी अशा वादग्रस्त आणि नियमबाह्य नेमणुका करणे अनुचित आणि अयोग्य आहे. त्यामुळे त्यांनी या नेमणुका रद्द कराव्यात, अशी मागणी केली असल्याची माहिती सुटाचे प्रमुख कार्यवाह डॉ. डी. एन. पाटील यांनी पत्रकाव्दारे दिली.
दरम्यान, याबाबत लोकमत प्रतिनिधीने विद्यापीठ प्रशासनाची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी डॉ. करमळकर यांच्याशी त्यांच्या मोबाईलवर दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
चर्चेवेळी सूचना
कुलगुरू निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना केवळ एक- दोन महिन्यांसाठी प्रभारी अधिष्ठातापदावर योग्य आणि पात्र व्यक्तीची नेमणूक करण्याची सूचना सुटाकडून चर्चेवेळी करण्यात आली होती, अशी माहिती डॉ. पाटील यांनी दिली.