उमदीतील वादग्रस्त जमीन व्यवहार रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2017 12:00 AM2017-05-14T00:00:11+5:302017-05-14T00:00:11+5:30
बाजार समिती संचालकांचा निर्णय : तीन ठिकाणी घेणार ३७ एकर जागा
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने उमदी येथे दुय्यम बाजार आवारासाठी एक कोटी दोन लाख ८० हजार रुपयांना जमीन खरेदीचा व्यवहार सुरु होता. जमीन खरेदीची माजी सभापतींकडून पणन संचालकांकडे तक्रारही केली होती. जमीन खरेदी व्यवहार वादग्रस्त ठरल्याने उमदीतील व्यवहार रद्द करण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या बाजार समिती संचालकांच्या बैठकीत घेण्यात आला.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत शेजाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी उपसभापती रामगोंडा संती, संचालक संतोष पाटील, जीवन पाटील, कुमार पाटील, अण्णासाहेब कोरे, देवगोंडा बिराजदार, दीपक शिंंदे, अजित बनसोडे यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.
उमदीतील जमीन खरेदीविरोधात माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि माजी सभापती भारत डुबुले यांनी पणन संचालकांकडे तक्रार केली होती. यामध्ये उमदी येथे खरेदी करण्यात आलेल्या जमिनीच्या दरामध्ये बाजार भावापेक्षा खूपच मोठी तफावत असल्याचे म्हटले होते. १६ लाख रुपये प्रतीएकर जमीन खरेदी करण्यात आलेली आहे. मात्र अद्याप खरेदी झालेली नसून, जमीन मालक सुरेश कल्लोळी यांना बाजार समितीकडून पाच लाख रुपयांची अनामत रक्कमही देण्यात आली होती. सर्वात महत्त्वाचे १६ लाख रुपये एकरी खरेदी केल्याचे दाखविले असताना, करण्यात आलेल्या खरेदीपत्रामध्ये मात्र ५ लाख ५ हजार रुपयांनी सदर जमीन खरेदी केल्याचीही तक्रार डुबुले यांनी केली होती. या जमीन खरेदीमध्ये सुमारे ९६ लाख ७५ रुपयांचा घोटाळा झाला असून, यामध्ये बाजार समितीचे नुकसान होणार असल्याचा आरोप केल्यामुळे उमदी येथील जमीन खरेदी व्यवहार वादग्रस्त ठरला होता. अखेर बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये हा खरेदी व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर या जागेऐवजी उमदी येथे इतर ठिकाणी १२ एकर, कवठेमहांकाळ येथील कवठेमहांकाळ-पंढरपूर रस्त्यावर १२ एकर आणि सांगलीतील सावळीमध्ये १३ एकर जमीन खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अन् लेखापालांना अश्रू अनावर झाले
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. उपलब्ध अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण सातत्याने पडतो. लेखा विभागात कर्मचारी नसल्याने लेखापालांच्या नाकीनऊ येते. संचालकांकडून कामे तात्काळ मार्गी लावण्याचा आग्रह केला जातो. संचालकांचा दबाव आणि अपूर्ण कामांमुळे त्रस्त झालेले लेखापाल आर. ए. पाटील यांना शनिवारी अश्रू अनावर झाले. सभापती शेजाळ यांच्यासमोर येऊन ते रडले. त्यांना शेजाळ, अभिजित चव्हाण, सचिव पी. एस. पाटील यांनी सावरले.
२८ पदे रिक्त
बाजार समितीमध्ये सध्या १३९ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी २८ पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी व इतर १२ पदांना मंजुरी मिळविण्यासाठी पणन संचालकांकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय झाला. पणन संचालकांची मान्यता मिळताच बाजार समितीमधील रिक्त जागांची भरती होण्याची शक्यता आहे.