शाहू समाधी स्मारकस्थळावर वादाची ठिणगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 05:22 PM2019-05-06T17:22:04+5:302019-05-06T17:26:39+5:30
नर्सरी बागेत होत असलेल्या राजर्षी शाहू समाधी स्मारकासंबंधी काही मागण्या घेऊन गेलेल्या सिद्धार्थनगरातील नागरिकांपैकी एकाने ‘सगळा चोर कारभार आहे’ अशा शब्दांत महापौर तसेच अधिकाऱ्यांचा अपमान केल्यामुळे महापौर सरिता मोरे व त्यांचे पती नंदकुमार मोरे संतप्त व आक्रमक झाले. ज्याने असे अनुद्गार काढले त्यास त्यांनी चांगलेच खडसावत शब्द मागे घेण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी दिवशी आणि त्यांच्याच नियोजित स्मारकाच्या परिसरात हा दुर्दैवी प्रकार घडला. दरम्यान, या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करीत, लागलीच पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला.
कोल्हापूर : नर्सरी बागेत होत असलेल्या राजर्षी शाहू समाधी स्मारकासंबंधी काही मागण्या घेऊन गेलेल्या सिद्धार्थनगरातील नागरिकांपैकी एकाने ‘सगळा चोर कारभार आहे’ अशा शब्दांत महापौर तसेच अधिकाऱ्यांचा अपमान केल्यामुळे महापौर सरिता मोरे व त्यांचे पती नंदकुमार मोरे संतप्त व आक्रमक झाले.
ज्याने असे अनुद्गार काढले त्यास त्यांनी चांगलेच खडसावत शब्द मागे घेण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी दिवशी आणि त्यांच्याच नियोजित स्मारकाच्या परिसरात हा दुर्दैवी प्रकार घडला. दरम्यान, या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करीत, लागलीच पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला.
महापौर सरिता मोरे व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी सोमवारी राजर्षी शाहू समाधी स्मारकाच्या कामाची पाहणी करण्यास, तसेच पुण्यतिथी निमित्त आदरांजली वाहण्याकरिता जाण्याचे ठरले होते. त्यानुसार महापौर मोरे या स्मारक परिसरात पोहोचल्या. आयुक्त मात्र अचानक बाहेरगावी गेल्याने अनुपस्थित राहण्याबाबत परवानगी घेतली होती.
महापौरांसह त्यांचे पती नंदकुमार मोरे, उपमहापौर भूपाल शेटे, शिक्षण सभापती अशोक जाधव, माजी महापौर हसिना फरास, आदिल फरास, नगरसेविका मेहजबीन सुभेदार, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता एस. के. माने यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.