सराफ व्यापाऱ्यांत वादावादी
By admin | Published: October 10, 2015 12:41 AM2015-10-10T00:41:18+5:302015-10-10T00:43:17+5:30
सर्वसाधारण सभा : नऊ संचालकांचे राजीनामे नामंजूर; सभासदांनी कार्यकारिणीला घेतले फैलावर
कोल्हापूर : नऊ संचालकांच्या राजीनाम्यावरून कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शुक्रवारी जोरदार वादावादी झाली. राजीनामा, मागील कार्यकारिणीचे कामकाज या मुद्द्यांवरून सभासदांनी अध्यक्ष, सचिव व अन्य संचालकांना फैलावर घेतले. शिवाय, संबंधित नऊ संचालकांचे राजीनामे नामंजूर केले.संघाचे सचिव किरण गांधी यांनी काही संचालक गटबाजी करून कामात अडथळा निर्माण करतात, अशी लेखी माहिती कार्यकारिणीला ४ आॅक्टोबरला झालेल्या मासिक सभेत कार्यकारिणीला दिली होती. यावेळी अध्यक्ष सुरेश गायकवाड यांनी हे पत्र फाडून संबंधित विषय मिटविला होता. यावेळी काही उपस्थित असलेल्या संचालकांनी याची माहिती बैठकीस अनुपस्थित असलेल्या अन्य संचालकांना दिली. त्यावर एकूण १५ संचालकांपैकी नाराज झालेले स्वीकृत संचालक अनिल पोतदार, मनोज राठोड, नितीन ओसवाल आणि निवडून आलेले संचालक बिपीन परमार, तेजस धडाम, जितेंद्र राठोड, नमित ओसवाल, नंदकुमार ओसवाल, संजय ओसवाल यांनी सचिव गांधी यांनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तरासह नऊ संचालकांनी आपल्या पदांचे राजीनामे गुरुवारी (दि. ८) कार्यकारिणीला सादर केले.
संबंधित संचालकांच्या राजीनाम्यांचा मुद्दा शुक्रवारी वार्षिक सर्वसाधारण सभेत पुन्हा उपस्थित झाला. संघाच्या कार्यालयातील सभागृहात झालेल्या सभेत राजीनाम्याच्या मुद्यांवरून सभासदांनी सचिव गांधी यांना फैलावर घेतले. शिवाय संबंधित नऊ संचालकांवर केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे सांगत राजीनामे नामंजूर केले.
यावेळी सभासद माणिक पाटील आणि किरण नकाते यांनी
मागील कार्यकारिणीच्या कामकाज आणि वारेमाप खर्चावर आक्षेप
घेत पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावर अध्यक्ष गायकवाड
यांनी संघाच्या लेखापरीक्षणाची प्रक्रिया सुरू असल्याचे
सांगितले. त्यानंतर सभासद शांत झाले. अहवाल मंजुरी तसेच काही संस्थांना देणगी देण्याच्या
ठरावाला सभासदांनी मान्यता दिली. (प्रतिनिधी)
ज्या सभासदांनी राजीनामे दिले आहेत, ते सभासदांनी नामंजूर केले असून त्याची माहिती संबंधित संचालकांना देणार आहे. मागील कार्यकारिणीने अनावश्यक खर्च केल्याने सध्या संघाची आर्थिक शिल्लक काहीच नाही. शिवाय ठोस असे काही काम करता आलेले नाही.
- सुरेश गायकवाड, अध्यक्ष, कोल्हापूर सराफ व्यापारी संघ
सचिव म्हणून काम करताना जे अनुभव आले ते कार्यकािरणीसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. यात कोणालाही दुखविण्याचा हेतू नव्हता. सभासदांनी जो निर्णय घेतला तो मान्य आहे.
- किरण गांधी, सचिव, कोल्हापूर सराफ
व्यापारी संघ
संघाची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने सध्या अनावश्यक खर्च होऊ नये, अशी आम्हा नऊ संचालकांची भूमिका आहे. शिवाय, व्यापारी बंधूंच्या हितासाठी आवश्यक ते कठोर निर्णय घेण्याकडे आमचा कल होता. त्याचा गैरअर्थ लावून सचिवांनी आमच्यावर आरोप केले; पण, सभासदांनी त्यांना योग्य उत्तर दिले.
- तेजस धडाम, संचालक, कोल्हापूर सराफ व्यापारी संघ