ज्येष्ठ नाट्य कलावंतांचा अवमान
By admin | Published: February 1, 2017 11:34 PM2017-02-01T23:34:28+5:302017-02-01T23:34:28+5:30
विश्रामगृहातून मध्यरात्री काढले बाहेर : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांच्या सोयीसाठी प्रकार
कुडाळ : महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या जिल्ह्यात ज्येष्ठ नाट्य कलावंतांचा अवमान झाल्याची घटना ओरोस सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय विश्रामगृहात घडली. मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांच्या नातेवाईकांना खोल्या मिळण्यासाठी या विभामगृहात ज्येष्ठ कलावंत व ९७ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांच्यासह ज्येष्ठ मराठी नाट्यकलाकार रवी पटवर्धन, अविनाश खर्शीकर, गिरीश ओक यांच्यासह महिला कलाकार यांना मध्यरात्री त्यांच्या साहित्यासहीत बाहेर काढले.
अगदी मध्यरात्री ज्येष्ठ कलाकारांसह महिला कलाकारांना रस्त्यावर आणल्याने जिल्हावासीयांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. तर त्यामुळे सांस्कृतिक समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यात ज्येष्ठ कलाकारांना असे अवमानित केल्याने अधिकाऱ्यांच्या स्वैराचारी वागण्यावर नाराजी व्यक्त करत शेखर सिंहावर रोष व्यक्त केला. या घटनेबाबत जिल्ह्यातील सांस्कृतिक, साहित्य क्षेत्रातून संताप व्यक्त करण्यात आला.
मध्यरात्री बाहेर काढल्यानंतर रात्रभर अस्वस्थ झालेल्या या ज्येष्ठ रंगकर्मींनी कुडाळमध्ये पत्रकार परिषद घेत आपली व्यथा मांडली. यावेळी ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर, ज्येष्ठ नाट्यकलावंत रवी पटवर्धन, अविनाश खर्शीकर आदी उपस्थित होते.
यावेळी गिरीश ओक म्हणाले, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे मंगळवारी रात्री ‘तुज आहे तुजपाशी’ हे नाटक होते. या नाटकाच्या सादरीकरणासाठी ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे आम्ही सर्व कलाकार मंगळवारी सकाळी आलो होतो. यावेळी राहण्यासाठी आयोजकांनी सर्व कलाकारांची व्यवस्था ओरोसच्या शासकीय विश्रामगृहावर केली होती. त्यामुळे तेथील खोली ताब्यात घेऊन विश्रांती घेतली व सायंकाळी नाट्यगृहाकडे गेलो.
यादरम्यान रात्री नाटक सुरू असताना काही शासकीय कर्मचाऱ्यांनी तेथे येऊन आमच्याकडे खोलीची चावी मागितली. त्यांना कारण विचारले असता त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांच्या पाहुण्यांसाठी खोली द्यायची आहे. त्यामुळे तुमचे साहित्य घेऊन तुम्ही खोल्या खाली करा, असे सांगितल्याचे ओक म्हणाले.
ओक पुढे म्हणाले, नाटक संपल्यानंतर आम्ही रात्री २ वाजण्याच्या सुमारास पुन्हा ओरोसच्या शासकीय विश्रामगृहावर आलो असता आम्हा सर्व कलाकारांचे साहित्य रूमच्या बाहेर काढून बाहेरच्या हॉलमध्ये आणून ठेवण्यात आले होते. याबाबत तेथील कर्मचाऱ्यांना विचारले असता, तेथील कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांच्या पाहुण्यांसाठी खोली देण्यात आली असून, तुम्हाला येथून जावे लागेल, असे रात्री २.३० वाजता सांगितले. त्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला साहेबांचा आदेश पाळावा लागणार, असे सांगितले.
अधिकाऱ्यांच्या पाहुण्यांच्या सोयीसाठी यावेळी विश्रामगृहावर असलेल्या सर्व नाट्यकलावंतांना येथून बाहेर काढण्यात आले. यावेळी जयंत सावरकर, रवी पटवर्धन या ८० वर्षांच्या ज्येष्ठ नाट्यकलावंतांचाही विचार करण्यात आला नसल्याचे गिरीश ओक यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्या नातेवाईकांसाठी खोल्या पाहिजेत, असे मंगळवारी दुपारीच सांगितले असते तर, आम्ही सायंकाळी खोल्या खाली केल्या असत्या. मात्र, अशाप्रकारे मध्यरात्री बाहेर काढणे हा प्रकार माणुसकी जपणारा नाही, असेही ओक यांनी सांगितले. तसेच नाटकाचे आयोजन केलेल्या आयोजकांनी आमची रहायची सोय शासकीय विश्रामगृहावर केली होती. त्यात आमची चूक काय आहे, असे सांगत गिरीश ओक यांनी अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या अधिकाऱ्याने पदाचा गैरवापर करणे चुकीचे असल्याचे त्यांनी यावेळी
सांगितले. (प्रतिनिधी)
महिला कलाकारांचे साहित्यही बाहेर फेकले
या कर्मचाऱ्यांनी त्या अधिकाऱ्याच्या आदेशानुसार आम्ही राहत असलेल्या खोल्यांमधील साहित्य बाहेर काढताना त्यांनी महिला कलाकारांच्या खोलीतील साहित्यही बाहेर काढून टाकले. हे कृत्य अत्यंत वाईट असल्याचे गिरीश ओक यांनी सांगितले.
या घटनेचे वृत्त या कलाकारांनी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांना सांगितले. त्यानंतर ते सर्वत्र पसरताच राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, आमदार नीतेश राणे यांनी फोनवरून ओक व सावरकर यांच्याशी सपंर्क साधत दखल घेतली. तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी कुडाळ येथे येत सर्व कलाकारांची भेट घेतली.
‘त्या’ सर्वांनी माफी मागावी : राणे
ओरोस येथील शासकीय विश्रामगृहात ज्येष्ठ नाट्य कलाकार तसेच त्यांच्या सहकलाकारांना दिल्या गेलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची मान खाली गेली आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो.
याबाबत राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री दीपक केसरकर व जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जाहीर माफी मागावी. अन्यथा काँग्रेसच्यावतीने या विरुध्द आवाज उठविण्यात येईल.
जिल्हाधिकाऱ्यांंकडून दिलगिरी
या दरम्यान जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी या ज्येष्ठ कलाकारांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधत झालेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती या कलाकारांनी दिली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मात्र, याबाबत अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.